ग्रामस्थांचे २०१५मध्ये रायगड जिल्हा प्रशासनाला पत्र; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही प्रांताधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

अलिबाग : दरड आणि मातीखाली गाडल्या गेलेल्या इरशाळवाडीतील बचावलेल्या कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी ज्या जागेची निवड करण्यात आली आहे, त्याच जागी आपले पुनर्वसन करावे, अशी मागणी इरशाळवाडी ग्रामस्थांनी आठ वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. इरशाळवाडीला दरडींचा धोका असल्याने येथील रहिवाशांचे चौक येथील जमिनीवर पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी जून २०१५मध्ये केली होती. मात्र, लालफितशाहीच्या फायलींच्या ढिगाखाली ते पत्र गाडले गेले आणि आठ वर्षांनी इरशाळवाडीही!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऐंशीहून अधिक ग्रामस्थांच्या मृत्यूनंतर इरशाळवाडीच्या पुनर्वसनासाठी प्रशासकीय हालचाली वेगाने सुरू आहेत. मात्र, २०१५साली आलेल्या पत्रानंतर ही तत्परता आणि संवेदनशीलता दिसली असती तर, आज अवघी इरशाळवाडी सुखाने सुरक्षितस्थळी नांदताना दिसली असती. पुणे जिल्ह्यातील माळीण हे गाव २०१४मध्ये डोंगराखाली गाडले गेल्यानंतर इरशाळवाडीतील ग्रामस्थांच्या मनातही भीतीची पाल चुकचुकली होती. असे संकट आपल्या वाडीवरही कोसळेल, याची जाणीव झाल्याने २५ जून २०१५ रोजी काही ग्रामस्थांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून पुनर्वसन करण्याची मागणी केली. चौक येथील सव्र्हे क्रमांक २४ या जमिनीवर वाडीचे स्थलांतर करावे, अशी मागणी या पत्रात करण्यात आली होती. हे पत्र मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना यासंदर्भात चौकशी करून कार्यवाही करण्याच्या सूचनाही केल्या. मात्र, त्यानंतर प्रशासनाने कोणतीही हालचाल केली नाही.
प्रशासकीय स्तरावर कमालीची अनास्था पाहून हताश झालेल्या इरशाळवाडी ग्रामस्थांपैकी काहींनी तात्पुरत्या सुरक्षेसाठी डोंगरांच्या पायथ्याशी असलेल्या नंबराची वाडी येथे झोपडय़ा उभारून तेथे आश्रय घेतला. मात्र, या झोपडय़ा उभारण्यात येत असतानाच वनजमिनीवर अतिक्रमण होत असल्याचे सांगत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या झोपडय़ा पाडून टाकल्या. शिवाय ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही दिला. त्यामुळे ग्रामस्थ पुन्हा इरशाळवाडीत परतले. मात्र, १९ जुलैच्या रात्री यातले अनेक संसार आणि माणसे कायमची नाहीशी झाली.

चौकशीची मागणी

प्रशासनाने इरशाळवाडी ग्रामस्थांच्या पत्राची वेळीच दखल घेतली असती तर, दुर्घटनेतील सगळे जीव आज सुखरूप असते, अशी खंत बचावलेल्या ग्रामस्थांनी व्यक्त केली. तसेच प्रशासकीय निष्काळजीपणाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, यासंदर्भात रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्याकडे विचारणा केली असता ‘याप्रकरणी माहिती घेऊन योग्य कार्यवाही केली जाईल,’असे ते म्हणाले.
आदिवासी समाजाच्या प्रश्नांबाबत मुळात प्रशासन उदासीन आहे. त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाबाबत सजग राहून पावले उचलली जातील असे वाटत नाही. पण इरशाळवाडी दुर्घटनेनंतर आदिवासी समाजाच्या वाडय़ा वस्त्यांच्या पुनर्वसनाबाबत कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यायला हवा. या वाडय़ा वस्त्यांच्या शेजारी डोंगरात होणाऱ्या उत्खननांबाबत श्वेतपत्रिका जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध करायला हवी. – वैशाली पाटील, सामाजिक कार्यकर्ता, आदिवासी हक्क समिती