वाई: अतिदुर्गम अशा कोयना, सोळशी, कांदाटी खोऱ्यातील १०५ गावांना अद्याप मूलभूत नागरी सुविधा मिळाल्या नाहीत ही वस्तुस्थिती असली तरी आता तापोळा-आहिर पुलामुळे या परिसरातील गावांचा विकास होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या पुलामुळे पश्चिम महाराष्ट्र व कोकण जोडला जाणार असल्याने या भागातील जनतेला त्याचा फायदा होऊन पर्यटन स्थळे विकसित होतील. पर्यायाने या भागातील लोकांना रोजगार ही उपलब्ध होतील, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या कांदाटी खोऱ्यातील दरे या गावी तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अतिदुर्गम अशा विकासापासून कोसो दूर असलेल्या या परिसरात अद्याप मूलभूत नागरी सुविधा मिळाल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मात्र कोयना भूमिपुत्र मुख्यमंत्रीपदी विराजमान असल्याने सहाजिकच या भागातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

हेही वाचा >>> शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा एकाच गाडीतून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण

विकासाच्या दृष्टीने दळणवळण महत्त्वाचे असते. त्यासाठी रस्त्यांचे जाळे निर्माण झाले पाहिजे. म्हणूनच मी पहिल्यांदा तापोळा-आहिर पुलाला मंजुरी दिली आहे. सध्या या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तापोळा विभागातील व कांदाटी खोऱ्यातील जनतेला दळण वळण साठी बोटीशिवाय पर्याय नाही. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी रस्ते नसल्यामुळे परिसरातील १०५ गावांचा विकास खुंटला होता. आता हा पूल झाल्याने या भागातील विकासाला चालना मिळणार आहे. या पुलाबरोबरच अप्रोच रस्त्यांची कामेही सुरू करण्यात आली आहेत, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

हेही वाचा >>> “मराठी माणसात व्यवसाय करण्याचं धाडस नाही”, चंद्रकांत पाटलांचं पुण्यात विधान; म्हणाले…

या पुलामुळे पश्चिम महाराष्ट्र व कोकण जोडला जाणार आहे जनतेचा वेळ व पैसा वाचणार असून या भागात नवीन पर्यटन स्थळे विकसित होण्यास मदत होणार आहे. पर्यटन स्थळे विकसित झाल्यावर आपोआपच येथील जनतेला रोजगार उपलब्ध होईल व विकासाला चालना मिळेल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.यावेळी त्यांनी परिसरातील नवनिर्वाचीत सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.