भाजपाने विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस (संगठन) श्रीकांत भारतीय, प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड आणि माजी मंत्री राम शिंदे, उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपाने आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्राम संघटनेने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. लवकरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन याबाबत कळवणार आहोत. त्यानंतर शिवसंग्राम आपली भूमिका ठरवेल, अशी प्रतिक्रिया विनायक मेटे यांनी दिली आहे.

हेही वाचा >>> विधानपरिषदेसाठी भाजपाकडून पंकजा मुंडेंना डावलण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “याचा परिणाम…”

“भाजपा सत्तेत असताना सर्व मित्रपक्षांना मंत्रिपदं मिळालं. फक्त शिवसंग्रामला मंत्रिपद दिलं गेलं नाही. तेव्हा शिवसंग्रामवर अन्याय झाला अशी भावना कार्यकर्त्यांची होती. त्यानंतर महामंडळाच्या बाबतीतही असंच झालं. अशा अनेक बाबतीत आमच्यावर अन्याय झाला. विधानपरिषदेच्या निवडणुकीवेळी आम्हाला शब्द देण्यात आला होता. मात्र तो पाळला गेला नाही. याच कारणामुळे आम्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस आणि भाजापाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आम्ही भेट घेणार आहेत,” असे विनायक मेटे म्हणाले.

हेही वाचा >>> नागपूर : महापालिका निवडणुका होईपर्यंत आमदार ठाकरेंकडेच काँग्रेस शहराध्यक्षपदाची धुरा

तसेच, “इतर पक्षांना प्रामाणिकपणे सोबत घेतलं जातं. नंतर वाऱ्यावर सोडून दिलं जातं, ही भावन कार्यकर्ते तसेच महाराष्ट्रातील जनतेमध्ये पसरत आहे. मित्रपक्षांना डावलण्याची प्रतिमा भाजपाची होतेय. अजूनही वेळ गेलेली नाही. या सर्व गोष्टींचा विचार करुन आम्ही फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी करु,” असेही विनायक मेटे म्हणाले.

हेही वाचा >>> गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल नेमके कोणाचे? राज्यसभा मतदानासाठी भाजप- शिवसेनेकडून दावे-प्रतिदावे

“वेगळ्या पक्षांना सोबत घेतलं जातं तेव्हा धोका देऊ नये अशी अपेक्षा असते. मात्र हा विश्वास आता कुठेतरी डळमळत आहे. ही चांगली परिस्थिती नाही. अनेकवेळा अन्या झालेला आहे. शिवसंग्रामचे दोन आमदार आहेत. बाकी कोणत्याही पक्षाचे आमदार नाहीयेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील मित्रपक्षांना डावलणार नाहीत अशी आमची अपेक्षा आहे,” असे विनायक मेटे म्हणाले. तसेच चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर शिवसंग्रामची भूमिका ठरवण्यात येईल. पण भूमिका घेण्याअगोदर त्यांनी मित्राचं कर्तव्य पार पाडावं,” असा संदेश मेटे यांनी दिला आहे.

Story img Loader