इतर आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांची आहे. परंतु, निवडणुका जवळ आल्या की काही राजकीय नेते आपली पोळी भाजून घेण्यासाठी पुढे सरसावतात. मग त्यांना मराठा आरक्षणाची आठवण होते. निवडणुका झाल्या की हे तथाकथित नेते गायब होतात. अशा तथाकथित नेत्यांनी गेल्या चार वर्षांत मराठा आरक्षणासाठी काय योगदान दिले, असा प्रश्न राष्ट्रवादीचे आ. जयंत जाधव, शहराध्यक्ष शरद कोशिरे, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी उपस्थित केला आहे. आरक्षणाच्या विषयावर बोलण्यापूर्वी शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर शिवसंग्राम संघटनेतर्फे येथे आयोजित मराठा आरक्षण जागर परिषदेत आ. मेटे यांनी छगन भुजबळ यांच्यावर विश्वासघात केल्याचा आरोप केला होता. यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मेटेंवर आगपाखड सुरू केली आहे.
भुजबळांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला नाही हे म्हणणाऱ्या मेटेंनी कधी त्यांच्याकडे जावून या विषयी पुढाकार घेण्यासाठी चर्चा केली का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मेटेंना निवडणूक आल्यावरच आरक्षणाची आठवण कशी येते, निवडणुकीच्या तोंडावर दिशाभूल करण्याव्यतिरिक्त मेटेंनी काय योगदान दिले ते सांगावे, असे आव्हान आ. जाधव यांनी दिले. मेटे हे ज्या पक्षाच्या जीवावर आमदार झाले, त्या पक्षाबद्दल व शासनाबद्दल बोलण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. समाजाच्या जीवावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळविलेल्या आमदारकीचा पहिले राजीनामा देऊन मराठी बाणा दाखवून द्या, असे आव्हानही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. मागासवर्गीय आयोगावर मागासवर्गीय सदस्य तर अल्पसंख्याक आयोगावर अल्पसंख्याक समाजाचे सदस्य असतात. त्याचप्रमाणे इतर मागास आयोगावर इतर मागास समाजाचे सदस्य असणे स्वाभाविक आहे. या सदस्यांच्या नेमणुकीचे अधिकार शासनाला आहे. मेटेंनी प्रथम आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग समाजाबद्दल बोलावे, असे आव्हान त्यांनी दिले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा