कोकणातल्या राजापूर येथील बारसूमधल्या प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा वाद सुरू आहे. प्रकल्पाच्या माती परीक्षणाला स्थानिकांचा विरोध सुरू आहे. पोलीस बळाचा वापर करून प्रशासनाने हा विरोध मोडून काढला. तसेच ड्रिलिंगचं काम सुरू केलं. यावेळी पोलिसांनी शंभरहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतलं. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) खासदार विनायक राऊत यांनी आज बारसू गावाला भेट दिली. तसेच ज्या ठिकाणी रिफायनरी उभारण्याची योजना आहे त्या परिसराची पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बातचित केली.
यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले की, भूमिपुत्रांचा आवाज दाबण्यासाठी पोलिसांची छावणी उभी केलेली आम्ही पाहिली. कोकणी माणसाचा आवाज दाबण्यासाठी बनवलेली छावणी, लाठी-काठी आम्ही पाहिली. राज्यभरातून येथे पोलीस आणले आहेत. हे कोणासाठी चाललंय? हे विरोधक इथले भूमिपूत्र नाहीत का? आंदोलकांच्या भूमिकेत उतरणाऱ्या स्थानिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हे ही वाचा >> बारसू रिफायनरीबाबत शरद पवारांच्या भेटीनंतर उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले…
मंत्री आणि प्रशासन इथल्या लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण करण्याचं काम करत आहेत. यांना केवळ कोणत्याही परिस्थितीत रिफायनरीचा गाडा पुढे रेटायचा आहे. त्यासाठीच ही दडपशाही सुरू आहे. यापूर्वी कधीही आम्ही कोकणात पोलिसांची दडपशाही पाहिली नव्हती. बारसूत शस्त्रसज्ज पोलीसफाटा आम्ही पाहिला. येथे वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकाराच्या मानगुटीला धरून बाहेर काढण्यात आलं. यांची केवळ हुकूमशाही सुरू आहे.