मराठा आरक्षण आणि कुणबी जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांचं १२ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. पण, अद्यापही सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे रविवारपासून उपोषण आणखी तीव्र करण्याचा इशारा जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला आहे. यातच शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
“एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून मराठा समाजाचं खच्चीकरण करण्याचं सुरू आहे,” असा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.
विनायक राऊत म्हणाले, “मराठा आरक्षणाचे मारेकरी म्हणून भाजपा आणि गद्दार सरकारचा उल्लेख करेल. मराठा समाजाचे नेते म्हणून मिरवणारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी आणि अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी आहेत. मराठ्यांचे दोन्ही नेते सत्तेत असूनही समाजाचं खच्चीकरण करण्याचं काम सुरू आहे. दोघांच्या माध्यमातून मराठ्यांचं नुकसान होत आहे.”
हेही वाचा : “माझ्या शब्दापुढे मराठा समाजाने जाऊ नये, कारण…”, मनोज जरांगे पाटलांचं आवाहन
“दिल्लीत आणि राज्यात सत्ता असतानाही मराठा आणि धनगर आरक्षमासाठी उचित पावलं उचलली जात नाहीत. उलट मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसून पोळी भाजण्याचं काम केलं जात आहे. शिंदे आणि पवार गटात मतभेद आहेत. एकमेकांच्या उरावर बसण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, एक ना एक दिवस यांचं विसर्जन होणार आहे,” असेही विनायक राऊत यांनी म्हटलं.
हेही वाचा : सरकारच्या बंद लिफाफ्यावर मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, “सरकारने त्या आदेशात…”
“आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला धाब्यावर बसवून पुढे ढकलला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘मर्यादित वेळे’त निर्णय देण्यास सांगितलं होतं. पण, विधानसभा अध्यक्षांकडून ‘मर्यादित वेळ’ म्हणजे यांची सत्ता संपेपर्यंत, असा अर्थ लावला जात आहे. टोलवाटोलवीचं काम सुरू आहे,” असा हल्लाबोल विनायक राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केला.