शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिंदे गटातील नेते रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे. नारायण राणे, रामदास कदम मराठा आणि कुणबी समाजात भांडणं लावण्याचं काम करत आहेत. त्याची दखल दोन्ही समाज घेतील, असं विनायक राऊतांनी म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
विनायक राऊत म्हणाले, “मनोज जरांगे-पाटलांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लाखोंचा मराठा समाज जरांगे-पाटलांच्या मागे उभा आहे. पण, नारायण राणे, रामदास कदम मराठा आणि कुणबी समाजात भांडण लावण्याचं काम करत आहेत. त्याची दखल दोन्ही समाज घेतील. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये.”
हेही वाचा : “१३ वा बॉम्बस्फोट मुस्लीम वस्तीत…”, भाजपाचा शरद पवारांवर गंभीर आरोप
विनायक राऊतांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावरही टीकास्र डागलंय. “केवळ पैशांची मस्ती आणि सत्तेचा दुरूपयोग करण्यात येत आहे. पैसे देऊन लोकांना आणलं जात आहे. पैशांची आमिष दाखवली जातात. मात्र, शिवतीर्थावर येणारा जनसमुदाय भुलथापांना आणि पैशांना बळी पडणारा नाही,” असं विनायक राऊतांनी सांगितलं.
हेही वाचा : शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “दडपशाहीमध्ये…”
“गेल्यावेळी एमएमआरडीएच्या मैदानात शिंदे गटाची बैठक झाली. यानंतर किती कंटेनर दारूच्या बाटल्या जमा झाल्या, हे माध्यमांनी दाखवलं आहे. शिवतीर्थ आणि गद्दारांच्या मेळाव्याची तुलना होऊ शकत नाही,” असा हल्लाबोलही विनायक राऊतांनी केला.