शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर मागील काही दिवसांमध्ये अनेक नेत्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. कीर्तिकर यांच्यानंतर आता ठाकरे गटातील कोकणातील एकमेव आमदार राजन साळवी हेदेखील लवकरच शिंदे गटात सामील होणार, असा दावा केला जात आहे. याच चर्चेवर उद्धव ठाकरे गटातील नेते विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजन साळवी खाल्ल्या मिठाला जागून शिवसेनेचे, उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी काम करतील, असे राऊत म्हणाले आहेत. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> शिवसेनेतील बंडखोरीवर बोलताना विनायक राऊतांचे मोठे विधान, म्हणाले “शंभर टक्के, सहा महिन्यांत…”

“राजन साळवी हे हाडाचे कार्यकर्ते आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही कसे काम करायचे हे त्यांनी अनेकवेळा दाखवून दिले आहे. काही लोक राजन साळवी यांच्या बाबतीत कंड्या पिकवण्याचे काम करत आहेत. त्यांचा तो धंदाच आहे. मात्र राजन साळवी हे खाल्ल्या मिठाला जागून शिवसेनेचे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे काम प्रामाणिकपणे करतील. निष्ठावंत म्हणजे काय असतं, हे ते दाखवून देणार आहेत, याची आम्हाला खात्री आहे,” असा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>> जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा स्वीकारणार का? विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले “माझ्याकडे…”

मागील काही दिवसांपासून राजन साळवी हे शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा आहे. एकीकडे ही चर्चा सुरू असतानाच त्यांनी शिंदे गटातील नेते उदय सामंत यांची भेट घेतल्याचा दावा केला जात होता. या द्वयींमध्ये साधारण एक तास चर्चा झाल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर खुद्द साळवी यांनी या चर्चा फेटाळल्या आहेत. मी ठाकरे गटातच राहणार असल्याची भूमिका साळवी यांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती. त्यानंतर साळवी उद्धव ठाकरेंसोबत वेगवेगळ्या कार्यक्रमात उपस्थित राहिले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinayak raut comment on rajan salvi eknath shinde group joining prd