शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सांगोल्यातील शिंदे गटाचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटलांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. “शहाजी बापु पाटलांसारखा माणूस राजकारणात फक्त विनोद करू शकतो,” असं मत विनायक राऊतांनी व्यक्त केलं. तसेच शहाजीबापू विनोद करू शकतात, मात्र मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही, असी टीकाही केली. ते रविवारी (२१ ऑगस्ट) सोलापूरमध्ये बोलत होते.
विनायक राऊत म्हणाले, “शहाजी बापू पाटील यांच्या सारखा माणूस राजकारणात फक्त विनोद करू शकतो, पण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. हे सांगोल्याच्या मतदारांनी ठामपणे दाखवून दिलं आहे. छोटे-छोटे विद्यार्थीही ‘नॉट ओके’ आणि ‘शिवसेना विल बी ओके’ असं म्हणत आहेत. त्यामुळे सांगोल्यातील जाहीर सभेत संपूर्ण परिस्थिती भगवामय दिसेल.”
“गुलाबराव पाटलांच्या बोलण्यात काहीही तथ्य नाही”
“पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांच्या बोलण्यात काहीही तथ्य नाही. ज्यावेळी आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीची वेळ मागितली. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या सर्व आमदारांना चहापाणासाठी वर्षा बंगल्यावर बोलावून घेतले आणि मनमोकळेपणाने त्यांच्याशी चर्चा केली होती,” असं विनायक राऊत यांनी नमूद केलं.
हेही वाचा : VIDEO: “मागून आले काय, मंत्री झाले काय…”, भाजपा मंत्र्यासमोरच आमदार संजय शिरसाटांनी बोलून दाखवली नाराजी
“…तेव्हा सर्व आमदारांनी शिवसेनेपासून दूर जाणार नसल्याची शपथ घेतली होती”
विनायक राऊत पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री तुमच्यापैकी कोणाला व्हायचं असेल, तर मी खुर्ची खाली करायला तयार आहे, असंही उद्धव ठाकरे त्यावेळी म्हणाले होते. त्यावेळी उपस्थित असलेल्या सर्व आमदारांनी शिवसेनेपासून दूर जाणार नसल्याची शपथ घेतली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी गुलाबराव पाटील आणि बाकीचे आमदार पळून गेले,” असं म्हणत विनायक राऊतांनी मंत्री गुलाबराव पाटलांवर टीका केली.