सध्या महाराष्ट्रात काळू-बाळूचा तमाशा सुरू असून ज्यांना राष्ट्रगीतासाठी नीट उभं राहता येत नाही, असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे, अशी टीका शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केली आहे. सांगोल्यात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. बाळासाहेबांच्या नावावर मतं मागणाऱ्या भडभुंच्या लोकांना राज्यातली जनता माफ करणार नाही, असे म्हणाले.
हेही वाचा – “१४ दिवस कारागृहात राहणाऱ्या राणा दाम्पत्याचा मला अभिमान”; देवेंद्र फडणवीसांचं अमरावतीत वक्तव्य
काय म्हणाले विनायक राऊत?
“महाराष्ट्रात काळू-बाळूचा तमाशा सुरू आहे. ज्यांना राष्ट्रगीतासाठी नीट उभं राहता येत नाही, असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे. हे मुख्यमंत्री राष्ट्रगीत सुरू असताना शर्ट खाली-वर करतात. हे आपल्या महाराष्ट्राचं दुर्देव आहे, अशी टीका विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. ”जर तुम्हाला शिवसेनेशी गद्दारीच करायची होती. तर भाजपात जायचे होते. मात्र, या लोकांना आपली आमदारकी विकली, १२ लोकांना आपली खासदारकी विकली. ४० चोर गेले म्हणजे शिवसेनेचा परिवार संपत नाही”, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर पुन्हा टीका; म्हणाले, “गद्दारांना…”
“मुंबईत भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांना बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत मनपावर भाजपाचा झेंडा फडकवायचा आहे. याचा अर्थ ते आता बाळासाहेबांच्या नावावर मत मागत आहेत. कारण मोदी पर्व संपलं आहे. आता मोदींच्या नावावर मत मिळणार नाही, हे कळलं तेव्हा बाळासाहेबांच्या नावावर मतं मागणं सुरू झालं आहे. अशा भडभुंच्या लोकांना राज्यातली जनता माफ करणार नाही”, अशी टीका त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.