शिवसेना पक्षातील बंडखोरीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर कठोर टीका करताना दिसतात. असे असतानाच ठाकरे गटातील नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना परतण्याचे आवाहन केले आहे. राऊतांच्या याच आवाहनावर ठाकरे गटातील नेते विनायक राऊत यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी एकदा बेईमानी केली ते बेईमानच आहेत. त्यांना परत घेणे म्हणजे घराला कीड लागण्यासारखे आहे, असे राऊत म्हणाले आहेत. तसेच आगामी सहा महिन्यांत निश्चितच विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका लगतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘टीव्ही ९ मराठी’ने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.
हेही वाचा >>> कुख्यात गुंड अरुण गवळी मुलाच्या लग्नाला हजर राहणार; पॅरोल मंजूर
“आम्ही आशेवर जगणारे लोक नाहीत. आम्हाला आता कर्तृत्वावर पुन्हा एकदा सगळे उभे करायचे आहे. आमचा पहिला विजय अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत झाला आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, अशी मागणी आम्ही केली नव्हती. ज्यांनी एकदा बेईमानी केली ते बेईमानच आहेत. बेईमानीला पुन्हा एकदा घरात थारा देणे म्हणजे घरात कीड लागण्यासारखे आहे,” अशी खोचक टीका राऊत यांनी केली.
हेही वाचा >>> जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा स्वीकारणार का? विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले “माझ्याकडे…”
“आगामी सहा महिन्यांत राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका लागणार आहेत. सध्या सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेबाबत तसेच सरकारच्या वैधतेबाबत खटला सुरू आहे. यावर जानेवारी ते फ्रेब्रुवारीपर्यंत निर्णय द्यावा लागेल. हा निकाल काय येईल हे स्पष्टच आहे. या निकालानंतर कदाचित राष्ट्रपती राजवट लावली जाईल. त्यानंतर राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील,” असे भाकित राऊत यांनी व्यक्त केले.
हेही वाचा >>>G20 Summit: २०३० पर्यंत भारतातील ५० टक्के वीजनिर्मिती अक्षय उर्जास्त्रोतांपासून- नरेंद्र मोदी
“शेवटची गद्दारी (खासदार गजानन कीर्तिकर यांचा शिंदे गटात प्रवेश) दोन दिवसांपूर्वी झाली. ती आम्हाला अपेक्षितच होती. त्यांनी शिवसेना पक्षाच्या अस्तित्वाला हात घालण्याचा प्रयत्न केला आहे. याच कारणामुळे शिवसैनिक पेटून उठला आहे. त्यांनी कितीही गद्दारीचा प्रयत्न केला, तरी शिवसैनिक त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,” असा विश्वासही विनायक राऊत यांनी व्यक्त केला.