ठाकरे आणि शिंदे गटाने शिवसेना पक्ष तसेच धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर दावा केलेला आहे. त्याबाबत आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. ठाकरे गटातील नेते विनायक राऊत यांनी निवडणूक चिन्ह आणि पक्षाबद्दल मोठे विधान केले आहे. आम्ही धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर पुराव्यानिशी दावा करत आहोत. निवडणूक चिन्ह आम्हालाच मिळणार आहे. एकनाथ शिंदे यांचा बोलविता धनी दुसराच आहे, असे राऊत म्हणाले. ते आज ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा >> “चंद्रकांत खैरे हा काय पुढारी आहे का? त्यांनी जाती-जातींत भांडण लावले,” संदिपान भुमरेंचा गंभीर आरोप
“आमचा धनुष्यबाण आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हावर पुराव्यानिशी दावा आहे. आमचा धनुष्यबाण या निवडणूक चिन्हासह पक्षावरही अधिकार आहे. एकनाथ शिंदे यांचा बोलविता धनी दुसरा आहे. शोध घेतल्यावर ते समजेल. राजकीय दबावापोटी एकनाथ शिंदे बोलत आहेत,” असा दावा विनायक राऊत यांनी केला.
हेही वाचा >> पंजाबमधील सुरक्षा त्रुटीवर राहुल गांधींची प्रतिक्रिया; म्हणाले “त्या तरुणाने जे केले त्याला…”
माझे आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांच्यातील वैर संपलेले आहे, असे विधान शिंदे गटातील नेते दीपक केसरकर यांनी केले होते. त्यावरही विनायक राऊत यांनी भाष्य केले. “दीपक केसरकर हे दलबदलू आहेत. सरडा जसा रंग बदलतो तसं ते बदलतात. दीपक केसरकर हे डुख धरून वागतात. त्यामुळे केसरकर यांनी नारायण राणे यांच्या प्रचारात उतरूदेत किंवा आणखी कोणाचा प्रचार करू देत, आम्हाला अडचण नाही. त्यांनी त्यांच्या मतदारसंघात डिपॉझिट वाचवण्याचा प्रयत्न करावा,” असा टोला राऊत यांनी दीपक केसरकर यांना लगावला.
हेही वाचा >> मोठी बातमी! लष्कर ए तोयबाचा उपप्रमुख अब्दुल रहमान मक्की जागतिक दहशतावादी म्हणून घोषित
राऊत यांनी भाजपाचे नेते निलेश राणे यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली. “निलेश राणे यांच्यावर बोलण्याची आमची इच्छा नाही. अशा घाणेरड्या वृत्तीचा माणूस जगात निर्माण झालेला नाही. निलेश राणे म्हणजे विकृती. या विकृतीला आम्ही भीक घालत नाही,” असे विनायक राऊत म्हणाले.