Vinayak Raut On rajan salvi allegations : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते राजन साळवी यांनी आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. लांजा राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी २०२४ चा पराभव जिव्हारी लागला असल्याचे यावेळी सांगितले. तसेच माजी खासदार विनायक राऊत हे विधानसभा निवडणुकीतील माझ्या पराभवाला कारणीभूत असल्याने आपण शिवसेना ठाकरे गटातून बाहेर पडल्याचे साळवी यांनी सांगितले आहे. २०२४ चा पराभव माझ्या जिव्हारी लागला आहे. या निवडणुकीत माझ्या पक्षातीलच नेत्यांनी माझ्याविरूद्ध काम केले. विनायक राऊत हेच माझ्या पराभवाला कारणीभूत असून त्यांच्यामुळे मी पक्ष सोडत आहे, असे साळवी यांनी जाहीर केले. विनायक राऊत यांनी माझ्याविरोधात काम केल्याचा गंभीर आरोप राजन साळवी यांनी केला. या आरोपांवर विनायक राऊत यांनी उत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांबद्दल बोलताना विनायक राऊत म्हणाले की, “खरंतर हे जाणारे स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थासाठी सत्ताधारी पक्षाकडे जात आहेत. राजन साळवी यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास, विधानसभेतील पराभव झाला, २३ तारखेला मतमोजणी झाली, २४ला मुंबईला गेले आणि २५ तारखेपासून मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांशी संपर्क साधून आपल्याला भवितव्य राहिलं नाही, म्हणून आपल्याला भाजपामध्ये जावं लागेल, असा सुतोवाच राजन साळवी यांनी किमान १०० बैठकींमध्ये केला होता”.
“देवेंद्र फडणवीस, रविंद्र चव्हाण यांनी असा शब्द दिलाय, आपण भाजपामध्ये जाऊ, तिथे आपल्याला एमएलसी देतील, १०० कोटींची कामे देतील अशी अनेक वक्तव्य या बैठकींमध्ये केली आहेत. फक्त भारतीय जनता पक्षाने दरवाजा अजिबात उघडला नाही. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधी भेट सुद्धा दिली नाही, अशावेळी केवळ नाईलाज म्हणून ज्यांच्या विरोधात लढले, ज्यांच्या विरोधात पोलीस तक्रारी केल्या त्या शिंदे गटाच्या सामंतांच्या हाताखाली जाऊन काम करण्याची नामुष्की राजन साळवी यांच्यावर आली आहे”.
आज जरी हे विकावू नेते भाजपा किंवा शिंदे गटात गेले तरी सर्वसामान्य कार्यकर्ता त्याहीपेक्षी मजबुतीने बाहेर येईल, आम्ही आता पुढच्या आठवड्यापासून तालुका निहाय पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठका घ्यायला सुरू करू तेव्हा शिवसेना(उद्धव ठाकरे) पक्षाची रत्नागिरी येथील ताकद दिसून येईल असे विनायक राऊत म्हणाले.
राजन साळवींच्या आरोपावर प्रत्युत्तर
गद्दारी करून दुसर्या पक्षात जात असताना, कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडण्याची सवय सर्वच पक्षबदलूची असते. कालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधी उमेदवाराने त्यांच्यावर आरोप केले आहेत, त्यांनी सांगितलं की राजन साळवींकडे गद्दारीची १३ सर्टिफिकेट आहेत. २००४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार बाळ माने यांना पाडण्यासाठी उदय यांचा उदय करून घेतला हे जगजाहीर आहे.
भाजपाचे आमदार डॉ. निलेश राणे यांनी राजापूरच्या जव्हार चौकात जे जाहीर भाषण केलं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की, या राजन साळवींनी प्रत्येक लोकसभा निवडणुकीत आमच्याकडून पैसे घेतले आहेत. हे जर खोटं असेल तर त्यांनी धूतपापेश्वराच्या पिंडीवर हात ठेवून सांगावं याचा त्यांनी खुलासा केलेला नाही, असेही विनायक राऊत यावेळी बोलताना म्हणाले.
© IE Online Media Services (P) Ltd