मागील काही दिवसांपासून शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याची चर्चा आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा शिंदे गटावर कुरघोडी करत आहे, असंही बोललं जात आहे. दरम्यान, शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी सूचक विधान केलं आहे. ४० आमदारांमुळे भाजपा पुन्हा एकदा सत्तेत आली. त्यामुळे ४० आमदारांनी आपली ताकद ओळखावी, असं कीर्तीकर म्हणाले. यावर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिंदे गटातील दहा मंत्री सोडले तर सगळ्या आमदारांच्या मनात खदखद आहे. त्यांना केवळ मंत्रीमंडळ वाढीचं गाजर दाखवण्यात येत आहे, हे सर्व आमदारांना कळून चुकलं आहे. त्यामुळे भविष्यात शिंदे गटातील आमदार एकनाथ शिंदेंना सोडून भाजपात जातील, असं भाकीत विनायक राऊत यांनी केलं. ते रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

हेही वाचा- “शेतकरी आंदोलनाच्या वेळी मोदी सरकारने धमकावलं”, ट्विटरच्या माजी सीईओच्या आरोपांवर सरकारचं उत्तर, म्हणाले…

गजानन कीर्तिकरांच्या वक्तव्याबद्दल विचारलं असता विनायक राऊत म्हणाले, “गजानन कीर्तिकर यांनी जे मत व्यक्त केले आहे, ते खरं आहे. शिंदे गटाचे १० मंत्री सोडले तर सगळ्यांच्या मनात खदखद सुरू आहे. त्यांना केवळ मंत्रीमंडळ वाढीचं गाजर दाखवायचा प्रकार चालू आहे. हे सर्व आमदारांना कळून चुकलं आहे. विकास कामांबद्दल सर्वांचीच नाराजी आहे.”

हेही वाचा- “जाहिरातीत बाळासाहेबांचा फोटो टाकायला तंतरली, मोदी, शाहांचे इतके…”, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना थेट सवाल

“शिंदे गटातील आमदारांना ५० खोके आणि शंभर कोटींची विकास कामं देण्याचं जाहीर केलं होतं. त्यांना ५० खोक्यांपैकी काही खोके दिले. पण विकास कामांच्या बाबतीत सर्वांचीच नाराजी आहे. त्यांनी मंजूर केलेली कामंही रद्द केली. १० पैकी ४ ते ५ मंत्र्यांचं ऐकून घेतलं जातंय, बाकीचे मंत्रीही अशीच आदळआपट करत आहेत. त्यामुळे भविष्यात शिंदे गटाचे आमदार एकनाथ शिंदेंना सोडून भाजपात जातील किंवा अन्य मार्ग पत्करतील, अशी दाट शक्यता आहे,” अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinayak raut on shinde group mla will join bjp eknath shinde devendra fadnavis rmm