रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात बारसू गावात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांनी कठोर विरोध केला आहे. माती परीक्षणाकरता अधिकारी आले असता त्यांनी या सर्वेक्षणाला विरोध केला. यावेळी ग्रामस्थांनी तेथे आंदोलन छेडले. मात्र, यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा दावा करण्यात येत आहे. तसंच, या आंदोलकांना अटकही करण्यात आली होती. याप्रकरणी कोकणातील खासदार विनायक राऊत यांनी महिला आंदोलकांनी घटनास्थळी घडलेल्या प्रकाराची तक्रार केल्याचं म्हटलं आहे. “माळरानाच्या दगडाची पर्वा न करता आंदोलकांना पोलिसांनी जबरदस्ती रेटले,” असं विनायक राऊत म्हणाले.
“ग्रामस्थ आंदोलकांनी आज दुपारी एक वाजता मातोश्री येथे येऊन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी महिला आंदोलकही तेथे आल्या होत्या”, असं विनायक राऊत म्हणाले. ते म्हणाले की, “अनेक महिला आंदोलकांना अमानुषपणे हाकलवून लावले. करवंदीच्या काट्याची पर्वा न करता, माळरानाच्या दगडाची पर्वा न करता आंदोलकांना पोलिसांनी जबरदस्तीने रेटले. काही जणांना मार लागला. पायाला, हाताला मार लागला. एवढंच नव्हे तर १३० महिला आंदोलकांना पकडलं होतं, पोलिसांच्या गाडीत टाकताना दंडुक्याने त्यांना खेचण्याचा प्रयत्न केला. अनेक भागांवर दंडुके लावून खेचण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार महिला आंदोलकांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली. यावेळी त्यांनी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचला.”
“शंभर टक्के स्थानिक ग्रामस्थ असलेल्या लोकांना भेटून आलो. रत्नागिरी, रायगड, ठाणे, कोल्हापूर या परिसरातील पोलिसांना बोलावून. पोलिसांची छावणी उभी केली. एसआरपीचे दलही बोलावण्यात आले. अशा पद्धतीने पोलिसी छावणी उभी करून तिथल्या ग्रामस्थांना जाता येत नाही. आजारी माणसाला डॉक्टरकडेही जाता येत नाही. चाकरमन्याला आपल्या गावी जाता येत नाही. रिफायनरी आम्हाला नकोय हे लोकशाही पद्धतीने सांगतायत त्या कार्यकर्त्यांना रेल्वेतून उतरताच ताब्यात घेतलं जातंय. चाकारमान्यांच्या घरी रात्री, अपरात्री पोलीस जात आहेत. घरी नाही भेटले तर नातेवाईकांच्या घरी जातात आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतात. तडीपारीच्या नोटीस बजावतात. काहींना न्यायायलायत हजर करतात. न्यायालायने सोडण्याचे आदेश दिल्यानंतरही चार-पाच तास कोंडून ठेवतात, आणि मग दुसऱ्या खटल्यात अटक करतात. नैसर्गिक न्यायापासून ग्रामस्थांना वंचित ठेवून रिफायनरी कशी दामटून न्यायची हे प्रकार सध्या त्या बारसू आणि परिसरात सुरू झाले आहेत. अर्थात बारसू परिसरात रिफायनरी नको, आमची सर्वांची मागणी ऐकून घ्या रिफायरी विरोधी संघटनांनी आतापर्यंत मुख्यमंत्र्यांना तीनवेळा पत्र लिहिले”, असंही विनायक राऊत यांनी यावेळी सांगितलं.