शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार विनायक राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. शिंदे गटातील बरेच जण संपर्कात आहेत. लोकसभा निवडणुकीआधी मिंधे गटात मोठा भूकंप होणार आहे, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच, गद्दारांनी उद्धव ठाकरे यांना शहाणपण शिकवण्याच्या भानगडीत पडू नये, अशी टीकाही विनायक राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. ते रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
राज्यातील २१ हून अधिक समाजवादी जनता परिवारातील संघटनांनी उद्धव ठाकरेंबरोबर राहण्याचा निर्धार व्यक्त केला. यावरून ‘ज्यांनी बाळासाहेबांच्या विरोधात नेहमी भूमिका घेतली, विचार आणि कार्यपद्धतीवर आरोप केले, अशा सर्व लोकांचा कवटाळण्याचं काम ठाकरे करत आहेत,’ अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली. याला विनायक राऊतांनी प्रत्युत्तर दिलं.
हेही वाचा : “माजी मुख्यमंत्री कुणी केलं, हे…”, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
“मुख्यमंत्र्यांचा तिळपापड होणं स्वाभाविक आहे. कारण, देशात इंडिया आघाडी ताकदवान होत आहे. लोकशाहीवादी सर्व पक्ष इंडिया आघाडीला पाठिंबा देत आहेत. समाजवादी संघटनांची ताकद उद्धव ठाकरेंकडे आल्यानं इतरांची जळफळाट होत आहे. इंडिया आघाडी २०२४ साली चमत्कार करेल,” असा विश्वास विनायक राऊतांनी व्यक्त केला.
‘ज्याप्रमाणे अन्नात भेसळ होते, त्याप्रमाणे हिंदुत्वात मिलावट करण्याचा प्रयत्न होतोय’, असं टीकास्र मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर सोडलं होतं. यावर विनायक राऊत म्हणाले, “हे हिंदुत्वाचे बेईमान झाले आहेत. जेवत्या ताटात कुणी घाण केली, हे विचारलं तर जग नाव सांगेल. त्यामुळे गद्दारांनी उद्धव ठाकरेंना शहाणपण शिकवण्याच्या भानगडीत पडू नये.”
हेही वाचा : “सदावर्तेंनी आमचा नाद करू नये, तर भुजबळांनी कधीच…”, नरेंद्र पाटलांचा हल्लाबोल
“गद्दारी केलेल्या १३ खासदारांपैकी ३ लोकांना निवडणूक लढण्याची संधी मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. बाकीच्या १० जणांचं विसर्जन १०० टक्के होणार आहे. त्यांच्यातील बऱ्याचं जणांचे निरोप येत आहे. सध्या कुणाचंही नाव सांगणार नाही. पण, मिंधे गटात मोठा भूकंप होणार आहे. एप्रिल महिन्यात लोकसभेच्या निवडणुका आहेत. फेब्रुवारी महिन्यात आचारसंहिता जाहीर होण्याच्या अगोदरच हा भूकंप होईल,” असा दावा विनायक राऊतांनी केली.