महायुतीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळावं यासाठी मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत प्रयत्नशील आहेत. युतीत ही जागा शिवसेनेकडे होती. आता महायुतीत शिवसेनेचा शिंदे गट या जागेसाठी प्रयत्न करत आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्षातील अनेक आमदार आणि खासदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले. परंतु, रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत हे शिवसेनेच्या ठाकरे गटातच आहेत. त्यामुळे विनायक राऊत हे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर तिसऱ्यांदा निवडणूक लढतील असं दिसतंय. तर महायुतीत या जागेसाठी तीन दावेदार आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे, मंत्री रवींद्र चव्हाण आणि शिंदे गटातील नेते किरण सामंत हे या जागेवर तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, किरण सामंत यांच्या कथित व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. किरण सामंत यांनी ‘रौकेगा कौन?’ (कोण रोखणार?) असं व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. सामंतांच्या या स्टेटसनंतर महायुतीत तणाव निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विनायक राऊत म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचं तिकीट मिळवण्यासाठी भाजपा आणि गद्दार गटात रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यांनी एकमेकांच्या उरावर बसायला सुरुवात केली आहे. या मतदारसंघात कोणीही उभे राहिले तरी आमच्यासाठी काळजीचं कारण नाही. रवींद्र चव्हाण असो अथवा किरण सामंत असो, आम्हाला कोणत्याही परिस्थितीत त्यांना अडीच लाखांच्या मतफरकाने पाडायचं आहे. त्यासाठी आमचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. इथे त्यांच्याकडून कोण येतंय याची आम्हाला चिंता नाही. परंतु, तिकडची परिस्थिती गंभीर आहे. कोणत्याही परिस्थितीत १० जानेवारीनंतर भाजपा आणि गद्दार गट एकमेकांच्या उरावर बसणार आहे.
हे ही वाचा >> “महाविकास आघाडीचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला, आता फक्त…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
महायुतीत किरण सामंत यांना तिकीट मिळालं नाही तर शिंदे गट भाजपाच्या विरोधात जाईल का? असा प्रश्न विचारल्यावर विनायक राऊत म्हणाले, आम्ही त्यांच्याबद्दल विचारच केला नाही. आम्ही त्यांच्यावर फार वेळ घालवत नाही. आम्हाला लढायचं आणि जिंकायचं आहे. जिंकण्यासाठी आमचा कार्यकर्त्यांचा जबरदस्त ताफा तयार आहे.