तब्बल ५५ वर्षांहून अधिक काळ काँग्रेससह जोडलेल्या देवरा कुटुंबाने आज काँग्रेसची साथ सोडली. माजी खासदार मिलिंद देवरा यांनी आज (१४ जानेवारी) शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. मिलिंद देवरा यांचे वडिल मुरली देवरा हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते. मुरली देवरा यांनी १९६८ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर नगरसेवक, महापौर, खासदार आणि केंद्रीय मंत्री अशी अनेक पदं भूषवली होती. दक्षिण मुंबईतून ते चार वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्यापाठोपाठ मिलिंद देवरा यांनी आपल्या वडिलांचा वारसा चालवला. मिलिंद देवरादेखील दोन वेळा दक्षिण मुंबईतून खासदार म्हणून निवडून आले होते. अखेर दोन पिढ्यांचा काँग्रेसबरोबरचा प्रवास आज संपुष्टात आला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला राम राम ठोकत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान, मिलिंद देवरा यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी देवरांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
देवरा यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर भाजपा आणि शिंदे गटाने म्हटलं आहे की, लोकसभा निवडणुकीआधी हा पहिलाच मोठा पक्षप्रवेश आहे. महाविकास आघाडीला असे अनेक धक्के बसणार आहेत. यावर प्रतिक्रिया देताना खासदार विनायक राऊत म्हणाले, याला आम्ही धक्के म्हणत नाही. प्रत्येक पक्षात असा टाकाऊ माल असतो. ही घाण निघून जातेय ते बरं झालं.
खासदार विनायक राऊत यांनी काही वेळापूर्वी मुंबई तकशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वात आधी मिलिंद देवरा यांच्या वडिलांना म्हणजेच मुरली देवरा यांना मुंबईच्या महापौरपदी बसवलं होतं. अशी ब्याद आम्हाला शिवसनेत नको होती. ते आमच्याकडे येण्याचा प्रयत्न करत होते. काही दिवसांपूर्वी ते म्हणाले होते, ‘मला दक्षिण मुंबई मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट द्या, मी तुमच्याकडे (ठाकरे गट) येतो.’ त्यांनी आमच्या पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दक्षिण मुंबईचे स्थानिक खासदार अरविंद सावंत यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. त्यामुळे मिलिंद देवरा त्या दुकानात गेले जिथे त्यांना विकत घेण्यास तयार होते.
हे ही वाचा >> “दोन वेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला घेऊन…”, नाना पटोलेंचा शिंदे गट अन् मिलिंद देवरांना टोला
विनायक राऊत म्हणाले, देवरा शिंदे गटात गेले असले तरी दक्षिण मुंबईतली मुंबईकर जनता त्यांचा सुपडा साफ करेल. देवरा यांना भविष्यात संसद कधीच दिसणार नाही, अशा पद्धतीने मुंबईकर त्यांचा पराभव करतील.