सध्या देशभरामध्ये दिग्दर्शक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाला पंजाब सरकार, हरियाणा सरकार, गोवा सरकार आणि मध्य प्रदेशमध्ये टॅक्स फ्री म्हणजेच करमुक्त केले आहे. आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट महाराष्ट्रातही टॅक्स फ्री करावा अशी मागणी केली आहे. हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसला तरी राणे कुटुंबियांचे कट्टर विरोधक असणारे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मात्र हा चित्रपट टॅक्स फ्री करावा असं मत व्यक्त केलंय.
शिवसेनेचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण चित्रपट अद्याप पाहिला नसला तरी काश्मिरी पंडितांचं पुनर्वसन हा महत्वाचा मुद्दा असल्याचं नमुद केलंय. “मी तो चित्रपट पाहिला नाही त्यामुळे मी त्यावर कमेंट करु शकत नाही. काश्मिरी पंडितांचं पुनर्वसन हा महत्वाचा मुद्दा आहेच. काल सुद्धा काश्मीवर सभागृहात चर्चा झाली,” असं विनायक राऊत यांनी मंगळवारी म्हटलं.
नक्की वाचा >> विश्लेषण : चित्रपट टॅक्स फ्री होतो म्हणजे काय होतं? तिकिटांचे दर कमी होतात का?; फायदा कोणाला होतो?
विनायक राऊत यांनी कलम ३७० रद्द झाल्यानंतरही काश्मिरी पंडितांचा मुद्दा हा सुटलेला नसल्याचं नमूद केलं. “त्या आगोदरच्या अधिवेशनामध्ये सुद्धा जम्मू-काश्मीरला अखंड भारताचा भाग करत असताना म्हणजेच ३७० कलम रद्द झाल्यानंतर काश्मीर अखंड भारताचा भाग झालेला आहे. पण त्यानंतरही काश्मिरी पंडितांचं पुनर्वसन हा मुद्दा ऐरणीवरच आहे,” असं ते म्हणाले.
नक्की वाचा >> Video: The Kashmir Files वरुन मोदींनी सुनावलं; म्हणाले, “ज्यांना वाटतं की हा चित्रपट योग्य नाही त्यांनी…”
‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट चांगला असून अशा चित्रपटांची निर्मिती झाली पाहिजे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्याचं सांगत विनायक राऊत यांनी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना विनायक राऊत यांनी, “पंतप्रधान ते म्हणत असतील तर ते योग्यच आहे,” असं म्हटलं.
नक्की वाचा >> The Kashmir Files संदर्भातील ‘त्या’ पोस्टमुळे स्वरा भास्करवर अनेकजण संतापले; म्हणाले, “तुझ्या सॉफ्ट पॉर्न सिरीजला…”
या चित्रपटाला राज्यामध्ये टॅक्स फ्री करण्याची मागणी केली जात आहे यासंदर्भात विचारम्यात आलं असता विनायक राऊत यांनी, “नक्कीच, हा चित्रपट टॅक्स फ्री व्हायला काही हरकत नाही,” असं उत्तर दिलं. पुढे बोलताना त्यांनी, “या चित्रपटाबद्दल जे ऐकलंय, पेपरला वाचलंय त्यानुसार हा चित्रपट टॅक्स फ्री होणं आवश्यक आहे,” असंही म्हटलंय.