Vinayak Raut : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस ५ डिसेंबरला शपथ घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचा शपथविधी सोहळा आझाद मैदान याठिकाणी पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे सत्तेत सहभागी होणार की नाही? हा सस्पेन्स कायम आहे. एकनाथ शिंदे यांनी लवकरच स्पष्ट करेन असं सांगितलं आहे. तर ठाकरे सेनेच्या नेत्याने एकनाथ शिंदेंची गरज संपली आहे असा टोला लगावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

आज आम्ही राज्यपाल महोदयांची भेट घेऊन महायुतीचं सरकार स्थापन करण्याची संमती मागितली. राज्यपाल महोदयांनी संमती दिली. ५ डिसेंबरला संध्याकाळी साडेपाच वाजता शपथविधी आहे. मला आनंद आहे की अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून शिफारस केली होती. आज मी शिवसेनेचं समर्थन असलेलं पत्र राज्यपालांना दिलं आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह, जे. पी. नड्डा यांनी जो निर्णय घेतला त्याला आम्ही पाठिंबा दिला आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. महायुतीला आजवरच्या इतिहासात कधीही इतकं मोठं बहुमत मिळालं नव्हतं. मी आजारी होतो तरीही अनेक बातम्या चालवण्यात आल्या. पण खेळीमेळीच्या वातावरणात सरकार स्थापन होतं आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. दरम्यान एकनाथ शिंदे सत्तेत सहभागी होतील की नाही हे स्पष्ट व्हायचं आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत ( Vinayak Raut ) यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

काय म्हणाले विनायक राऊत?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस ५ डिसेंबरला शपथ घेत आहेत. २३ तारखेला मतमोजणी झाली त्यानंतर १० ते १२ दिवसांनी महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळतो आहे. खऱ्या अर्थाने हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. एवढं प्रचंड बहुमत मिळूनही महाराष्ट्रात मुख्यमंत्री ठरला नव्हता. सुमारे १३ दिवस महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळू शकला नाही यामागचं कारण काय? हे भाजपा आणि गद्दार गटाने स्पष्ट करणं गरजेचं आहे. दोन दिवसांपासून लाडक्या बहिणींची वाताहत लावण्याचं काम सुरु झालं आहे. महाराष्ट्रातला शेतकरी हाल सहन करतो आहे. या प्रश्नांच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे आमचं लक्ष आहे असं विनायक राऊत ( Vinayak Raut ) यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- Eknath Shinde on CM: मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट

एकनाथ शिंदेंबाबत काय म्हणाले विनायक राऊत?

“एकनाथ शिंदेंच्या निर्णयाला आता काडीची किंमत राहिलेली नाही. गरज असेल तर या नाहीतर चालते व्हा असं सांगायची ताकद भाजपाने ठेवली आहे. ५ डिसेंबरला जो शपथविधी होतो आहे त्यासंबंधीच्या निर्णयात एकनाथ शिंदे सहभागी नाहीत. तसंच त्यांच्या विचारांना कुठलीही किंमत देण्यात आलेली नाही. तु्म्हाला गरज असेल तर आमच्या मंत्रिमंडळात या नाहीतर अजित पवार आहेत बरोबर. अजित पवार आणि छगन भुजबळांनी शिंदे गटाची विकेट कधीच काढली आहे. ” असंही विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले.

एकनाथ शिंदेंची गरज आता संपली आहे

एकनाथ शिंदेंची गरज आता संपली आहे. शिवसेना फोडण्याचं पाप भाजपाने शिंदेंच्या माध्यमातून केली आहे. तरीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार निवडून आले आहेत. महाराष्ट्राची फसवणूक जशा प्रकारे करण्यात आली आहे ती पुरे झाली. आता महाराष्ट्राचे प्रश्न सोडवा किंवा ते सोडवण्यासाठी तुम्ही काय करणार ते सांगा असंही विनायक राऊत म्हणाले. वारेमाप पैशांचा वापर निवडणुकीत केला गेला. तसंच ईव्हीएमचा घोटाळा १०० टक्के झाला आहे. हा मेरिटवर मिळालेला विजय नाही असंही राऊत ( Vinayak Raut ) म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinayak raut slams eknath shinde said now there is no need of eknath shinde in mahayuti scj