शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर सभा घेत आहेत. उद्धव ठाकरे यांची आज जळगावमधील पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर जळगामधलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान, आम्ही दगड मारून सभा, आंदोलनं उधळून लावणारे लोक आहोत, असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. गुलाबरावांच्या या वक्तव्यावर वेगवेगळ्या नेत्यांकडून राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता राऊत म्हणाले की, त्यांनी फेकावा दगड आणि त्या दगडासहित घरी जावं. या पलिकडे मला काहीच बोलायचं नाही. उलट आज उद्धव ठाकरे यांची पाचोऱ्यात मोठी सभा होईल. ही सभा पाहून त्यांचे (गुलाबरावांचे) डोळे बंद होतील.
राऊत म्हणाले की, आजच्या उद्धव ठाकरे यांच्या सभेला आलोट गर्दी जमेल. ही गर्दी पाहून गुलाबचा गुलाब फुलणार की नाही याची भिती गुलाबरावांना आहे. त्यामुळे हा त्यांचा त्रागा सुरू आहे
आम्ही सध्या सभा घेणारे, उधळवणारे नाही : अनिल परब
दरम्यान, गुलाबरावांच्या वक्तव्यावर आमदार अनिल परब यांची प्रतिक्रियादेखील समोर आली आहे. परब म्हणाले, आम्ही सध्या सभा घेणारे आहोत, उधळवणारे नाही. सध्या आम्हाला सभा घ्यायची आहे, उधळवायची नाही. ज्यांना उधळवायची आहे त्यांनी यावं.