शिंदे गटाने वृत्तपत्रांमधून जोरदार जाहिरातबाजी केली आहे. ‘देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात शिवसेनेच्या शिंदे गटाने दिली आहे. राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अधिक लोकप्रिय असल्याची आकडेवारी एका सर्व्हेक्षणाच्या आधारे शिंदे गटाने जाहीर केली आहे. शिंदे गटाच्या या जाहिरातबाजीवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या जाहिरातीमुळे भाजपातील नेते नाराज झाल्याचंही बोललं जात आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“तुमच्या घरात येऊन मी तुमचं घर कसं उद्ध्वस्त करू शकतो? हे एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांना दाखवून दिलं आहे. एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा दुटप्पीपणा जाहिरातीतून स्पष्ट झाला आहे,” अशी टीका विनायक राऊतांनी केली आहे. ते रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
शिंदे गटाच्या जाहिरातबाजीबाबत विचारलं असता विनायक राऊत म्हणाले, “तुमच्या घरात येऊन मी तुमचं घर कसं उद्ध्वस्त करू शकतो? हे एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांना दाखवून दिलं आहे. त्यांनी शिवसेना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. तसेच ते भाजपालाही मोडकळीस आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हा जो सर्व्हे आला आहे, तो सर्व्हे कोणत्या एजन्सीने केला? त्याचा काहीच अधिकृत खुलासा त्यांनी केला नाही.”
हेही वाचा- “भविष्यात शिंदे गटाचे आमदार भाजपात जातील”, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचं विधान चर्चेत
“केवळ स्वत:चा ढोल बडवून आपली वाहवा करून घेण्याचा प्रयत्न या सर्व्हेच्या माध्यमातून होतोय. ज्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांना (एकनाथ शिंदे) मुख्यमंत्रीपद मिळालं, त्याच भाजपाला खाली ढकलायचं आणि पंतप्रधानांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात आपलं वर्चस्व निर्माण करण्याचं, हा दुटप्पीपणा या जाहिरातीमधून स्पष्ट झाला.तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जी लोकप्रियता होती, त्याचे रेकॉर्ड कोणीही मोडू शकत नाही,” असंही विनायक राऊत पुढे म्हणाले.