रत्नागिरी: कोकणातील विधानसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मागणी नुसार निवडणुकीत पक्षांच्या विरोधात काम करणा-यांवर आता कारवाई करण्यात येणार असल्याचे माजी खासदार विनायक राऊत यांनी सांगितले आहे. तसेच या पदाधिकारी लोकांना कार्यकारणीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे.
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विरोधात जावून महाविकास आघाडीच्या विरोधात काम केले होते. याचा मोठा फटका ठाकरेंच्या शिवसेनेला बसला होता. मात्र अशा विरोधात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना लवकरच पक्षाच्या कार्यकारिणीतून नारळ देण्यात येणार असल्याचे शिवसेना सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी चिपळूण येथे सांगितले.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी चिपळूण येथे आले असता ते बोलत होते. यावेळी राऊत म्हणाले, प्रत्येक पक्षात निवडणुकीच्या काळात काही बेईमान लोक मान वर काढत असतात, तसे शिवसेनेतही बेईमान आणि गद्दार लोक निघाले आहेत. मात्र अशा बेइमान लोकांना योग्यवेळी त्यांची जागा दाखवून देण्याचे काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही करणार असल्याचे स्पष्ट केले. भास्कर जाधव यांनी केलेल्या सूचनाचे फार भांडवल करण्याची गरज नाही. मात्र पक्षाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कालावधी निश्चित करून देण्याची आवश्यकता आहे. ती आमदार भास्कर जाधव यांनी केलेली सूचना योग्यच आहे. या सूचनेप्रमाणे पक्षाच्या घटनेत तसा बदल करण्याचे उद्धव ठाकरे यांनी मनावर घेतले आहे. त्यामुळे या सूचना केल्या म्हणजे त्यांनी काही वावगे केलेले नाही, असेही विनायक राऊत यांनी सांगितले.