२०१९ साली शिवसेना आणि भाजपाच्या युतीबाबत भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मोठं विधान केलं आहे. ” २०१९ साली भाजपाने शिवसेनेबरोबर युती करण्याची गरज नव्हती. शिवसेनेला दुय्यम भूमिका बजावणं त्रासाचं होतं,” असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. ते ‘मुंबई तक’च्या ‘चावडी’ या कार्यक्रमात बोलत होते.
“२०१९ साली काही जणांचा मतं होतं की, शिवसेनेबरोबर युती करावी, काहींच्या मते युती करु नये असं होतं. मला तेव्हा वाटत होतं की, भाजपाने युती करण्याची गरज नव्हती. शिवसेनेला दुय्यम भूमिका बजावणं हे त्रासाचं होतं. सेना पक्षप्रमुखांना कधी हे चालणार नाही,” असं विनोद तावडेंनी सांगितलं.
हेही वाचा : “अरे टिल्ल्या तुझ्यात हिंमत असेल तर…”, अमोल मिटकरींचा अप्रत्यक्षपणे नितेश राणेंवर हल्लाबोल
“महापालिका किंवा अन्य निवडणुकांच्या जागावाटप व्हायच्या, त्यात त्यांना एकतरी अधिक जागा जास्त हवी असायची. २०१४ साली सुद्धा युतीत एक जागा जास्त राहू द्या, ही त्यांची मानसिकता असल्यामुळे दुय्यम भूमिका ही कधीच शिवसेनेला चालणार नाही,” असं विनोद तावडेंनी म्हटलं.
हेही वाचा : “शिवराज्याभिषेकास ६ जून २०२४ ला ३५० वर्षे होतात, पण…”, ‘त्या’ प्रकारावरून जितेंद्र आव्हाड संतापले
“२०१९ साली शिवसेना यापद्धतीने दगाफटका करेल, हे कल्पनेतच नव्हतं. शिवसेनेच्या दृष्टीने तत्कालीन फायदा झाला असेल. सगळ्यात महत्वाचं बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं काय होतं, तर दिलेला शब्द पाळणं. हा त्यांचा राजकारणातील महत्वाचा गुण होता. तोच गुण २०१९ साली उद्धव ठाकरेंनी मोडला. त्याची जुन्या शिवसैनिकांत मोठी चर्चा आहे. तसेच, मुख्यमंत्रीपदाबाबत ठरलंच नव्हतं, तर कशाला हो म्हणायचं,” असेही विनोद तावडेंनी स्पष्ट केलं आहे.