Vinod Tawde send legal notice to Congress leaders : विरारच्या विवांता हॉटेल मध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला होता. या आरोपानंतर विरोधकांनी विनोद तावडे आणि भाजपावर सडकून टीका केली होती. विधानसभा निवडणूक मतदानाच्या काही तास आधीच हा प्रकार झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या प्रकारानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याचे देखील पाहायला मिळाले होते. दरम्यान विनोद तावडे आणि भाजपाच्या नेत्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. मात्र विनोद तावडे यांनी आता मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तावडे यांनी माध्यमांशी बोलताना यासंबंधी माहिती दिली आहे.

विनोद तावडेंची काँग्रेस नेत्यांना नोटीस

काँग्रेस नेत्यानी माझी आणि माझ्या पक्षाची बदनामी करण्यासाठी जाणिवपूर्वीक अशी विधाने केल्याचे तावडे म्हणाले आहेत. विनोद तावडे म्हणाले की, “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला, १९ नोव्हेंबर रोजी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया यांनी विनोद तावडे हे ५ कोटी रुपये मतदारांना वाटताना रंगेहात सापडले अशी विधाने केली. त्यांना या नाटकी विधानांनी त्यांना मला आणि माझ्या पक्षाला बदनाम करायचे होते”.

“मी एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो. गेली ४० वर्षे मी राजकारणात आहे, पण मी असे काम कधीच केले नाही. पण काँग्रेसच्या नेत्यांना माझी, पक्षाची आणि माझ्या नेत्यांची बदनामी करायची होती, म्हणून ते जाणीवपूर्वक मिडिया, ट्वीटर आणि लोकांसमोर खोटे बोलले. त्यामुळे मी त्यांना कोर्टाची नोटीस पाठवली आहे. त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा कारवाईला सामोरे जावे”, असेही विनोद तावडे म्हणाले.

नेमकं काय झालं?

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे १९ नोव्हेंबर रोजी विरारच्या विवांत हॉटेलमध्ये आले होते. भाजपाच्या या मतदारसंघातील उमेदवाराची भेट घेण्यासाठी विनोद तावडे या हॉटेलमध्ये आल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, त्याचवेळी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते क्षितिज ठाकूर यांच्यासमवेत हॉटेलमध्ये आले. या कार्यकर्त्यांकडून विनोद तावडेंकडून पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला. तसेच, कुणाला कसे पैसे वाटप झाले, याची माहिती असणारी डायरीही सापडल्याचा दावा करण्यात आला. यानंतर काँग्रच्या नेत्यांकडून विनोद तावडे यांच्यावर टीका करण्यात आली होती.

हेही वाचा>> Maharashtra Assembly Election Rebel Candidates Results : ‘या’ ३५ बंडखोरांनी महायुती-मविआची चिंता वाढवली, निवडणुकीच्या निकालावर परिणाम होणार?

विनोद तावडे यांनी मात्र मी निवडणुकीसंदर्भातील काही गोष्टी सांगण्यासाठी तिथे पोहोचलो होतो. त्यावेळी बविआचे कार्यकर्ते तिथे आले, त्यांचा असा गैरसमज झाला की, मी पैसे वाटतो आहे. पण याप्रकरणी आता निवडणूक आयोग आणि पोलीस तपास करत आहेत. हॉटेलमध्ये सीसीटीव्ही फुटेजही आहे. मी गेली ४० वर्ष राजकारणात आहे. जे सत्य आहे, ते समोर आहे. माझीसुद्धा मागणी आहे की याप्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया दिली होती.