विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने ६ हजार ४५९ कोटींचे पॅकेज घोषित करावे, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी बुधवारी केली. एवढय़ा रकमेचे पॅकेज घोषित केले नाही तर शासनाला विदर्भाबाहेर पडू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. विधानभवन परिसरात ते पत्रकारांशी बोलत होते.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने केवळ ४०० कोटींची तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यातच अनेक शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. मदत जाहीर करून ती न मिळाल्याचे देवराव शिंदे आणि बाळासाहेब देशमुख या शेतकऱ्यांनी शपथपत्राद्वारे शासनाला कळवले आहे. ही शपथपत्रे तावडे यांनी पत्रकारांना दाखवली.
या शासनावर शेतकऱ्यांचा विश्वासच उरला नाही. जी मदत केली ती १५ ते २५ दिवस कृषी अधिकारी व महसूल अधिकाऱ्यांकडे पडून होती. ही मदत कुणी वाटावी, याचाच निर्णय शासन घेऊ शकली नाही. मदत देण्यास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही तावडे यांनी याप्रसंगी केली.
विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावयाची झाल्यास ६ हजार ४५९ कोटींची गरज आहे. एवढी मदत झाली तरच शेतकरी नव्या दमाने शेती करतील. अन्यथा, त्यांना कर्ज घेऊनच शेती करावी लागणार आहे. ही मदत जाहीर केल्याशिवाय शासनाला विदर्भाच्या बाहेर पडू देणार नाही, असा निर्णय विरोधी पक्षाने घेतला असल्याचेही तावडे यांनी सांगितले.

Story img Loader