Cash For Votes in Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता संपुष्टात आला आहे. आता बुधवारी म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. पण एकीकडे मतदानाकडे सगळ्यांचं लक्ष असताना दुसरीकडे विरारमध्ये खळबळजनक घडामोडी घडताना दिसत आहेत. विरारच्या विवांत हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. दुसरीकडे भाजपानं हे आरोप फेटाळून लावले आहेत. विनोत तावडेंनी यादरम्यान २५ वेळा आपल्याला फोन करून माफी मागितल्याचा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.
नेमकं काय घडलं विरारमध्ये?
विरार पूर्वच्या मनोरीपाडा परिसरातील विवांता हॉटेलमध्ये आज सकाळी अचानक खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे या हॉटेलमध्ये आले होते. भाजपाच्या या मतदारसंघातील उमेदवाराची भेट घेण्यासाठी विनोद तावडे या हॉटेलमध्ये आल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, त्याचवेळी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते क्षितिज ठाकूर यांच्यासमवेत हॉटेलमध्ये आले. या कार्यकर्त्यांकडून विनोद तावडेंकडून पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला. तसेच, कुणाला कसे पैसे वाटप झाले, याची माहिती असणारी डायरीही सापडल्याचा दावा करण्यात येत आहे.
हितेंद्र ठाकूर यांचा मोठा दावा
दरम्यान, खुद्द हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडेंकडून आपल्याला फोन करण्यात आल्याचा दावा केला आहे. हितेंद्र ठाकूर यांनी एबीपी माझाला फोनवर दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये या दाव्याचा उल्लेख केला आहे. “पाच कोटी रुपये घेऊन विनोद तावडे तिथे आले होते. दोन डायऱ्यादेखील तिथे मिळाल्या आहेत. कुठे कसं वाटप केलं वगैरे माहिती त्यात आहे. विनोद तावडे हे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. यांना एवढी अक्कल नाही की नेत्यांनी ४८ तास आधी इतर मतदारसंघ सोडायचे असतात. एवढा साधा नियम आहे. आज कार्यकर्त्यांची बैठक होती आणि काय चाललंय हे? आता पोलीस काय करतायत हे बघायचं आहे”, असं हितेंद्र ठाकूर म्हणाले.
“भाजपावाल्यांनी सांगितलं तावडे पैसे घेऊन येत आहेत”
“मला भाजपावाल्यांनी सांगितलं होतं की विनोद तावडे ५ कोटी रुपये घेऊन येतायत. मला वाटलं राष्ट्रीय नेते एवढं लहान काम करणार नाही. पण इथे पाहिलं तर पैसे वाटप चालू आहे, कार्यकर्तेही आहेत. या डायऱ्यांमध्ये नोंदी दिसत आहेत”, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.
“प्रत्यक्ष पैसे वाटप होत असताना मी पाहिलेलं नाही. पण तिथे पैसे वाटले गेले आहेत. त्यांची डायरीही मिळाली आहे. सगळ्यांकडे पैसे पोहोचले आहेत”, असा दावाही हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. “मी निवडणूक अधिकाऱ्यांशी बोललो आहे. ते पोहोचले की नाही माहिती नाही. विनोद तावडे मला फोन करून विनंती करत आहेत की सोडवा यातून, माझी चूक झाली. माझ्या फोनवर त्यांचे २५ फोन आले आहेत. तुम्ही बघा, मी ते डिलिट करत नाही. ते म्हणत आहेत मला माफ करा, आता जाऊ द्या”, असं हितेंद्र ठाकूर म्हणाले.
भाजपानं आरोप फेटाळले
दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून हे आरोप फेटाळण्यात आले आहेत. भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात एबीपी माझावर प्रतिक्रिया दिली. “आरोप काहीही होऊ शकतात. पोलीस तिथे आहेत. महाराष्ट्रात पोलीस निवडणूक आयोगाच्या हाताखाली आहेत. पराभव समोर दिसू लागला म्हणून रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न आहे”, असं भातखळकर म्हणाले.