Vinod Tawde On Rahul Gandhi : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी विरारमध्ये काही घडामोडी घडल्या. एका हॉटेलमध्ये भाजपाचे नेते विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला. त्यांच्या या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. यासंदर्भातील काही व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.
तसेच बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचंही पाहायला मिळालं. जवळपास तीन ते चार तास हा संपूर्ण गोंधळ सुरु होता. या संपूर्ण प्रकरणानंतर विनोद तावडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच या प्रकरणावर राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल विचारला. मात्र, यानंतर आता विनोद तावडे यांनी त्यांच्या अधिकृत एक्सवरून (ट्विटर) राहुल गांधी यांच्या ट्वीटला प्रत्युत्तर दिलं. ‘तुम्ही स्वतः नालासोपारा या ठिकाणी या आणि हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज पाहा आणि नंतर पैसे कसे आले हे सिद्ध करा’, असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : “पैशासंदर्भातील सर्व बातम्या खोट्या”, पैसे वाटल्याच्या आरोपानंतर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया
विनोद तावडेंनी काय म्हटलं?
“राहुल गांधीजी, तुम्ही स्वतः नालासोपारा येथे या, हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज बघा, तिथली निवडणूक आयोगाची संपूर्ण कार्यवाही बघा आणि पैसे कसे आले हे सिद्ध करा. कोणतीही माहिती नसतानाचा अशा प्रकारचे वक्तव्य हे बालिशपणाचं नाही तर अजून काय?”, असं विनोद तावडेंनी म्हटलं आहे.
. @RahulGandhi जी, आप स्वयं नालासोपारा आएँ, होटल का सीसीटीवी फुटेज देखें, वहाँ हुई निर्वाचन आयोग की पूरी कार्यवाही देखें और यह साबित करें कि इस प्रकार पैसा आया।
— Vinod Tawde (@TawdeVinod) November 19, 2024
बिना किसी जानकारी के इस प्रकार का वक्तव्य बचपना नहीं तो और क्या है! https://t.co/KOgj6vQqJY
राहुल गांधी काय म्हणाले होते?
“पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, हे ५ कोटी रुपये कोणाच्या तिजोरीतून बाहेर आले? जनतेचा पैसा लुटून तुम्हाला टेम्पोमध्ये कोणी पाठवले?”, असा सवाल राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला.
‘सर्व बातम्या खोट्या’
पैसे वाटप आरोप प्रकरणानंतर प्रतिक्रिया देताना विनोद तावडे यांनी म्हटलं की, “पैशासंदर्भातील सर्व बातम्या खोट्या आहेत. त्यामध्ये काहीही तथ्य नाही. हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं की भाजपाच्या नेत्यांनी टीप दिली हे देखील खोटं आहे. आता या आरोपानंतर हितेंद्र ठाकूर गाडीत जाताना काय बोलले ते मला माहिती आहे. त्यामुळे यात काहीही तथ्य नाही”, असं विनोद तावडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.
तीन गुन्हे दाखल
“पैसे वाटपाच्या आरोप प्रकरणानंतर तीन गुन्हे दाखल झाले आहेत. एक गुन्हा असा दाखल झाला आहे की, आम्ही दोघांनी (हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे) मिळून पत्रकार परिषद घेतली. दुसरा गुन्हा असा दाखल झाला की मी माझा मतदारसंघ नसताना त्या ठिकाणी गेलो. तिसरा गुन्हा असा दाखल झाला की, हितेंद्र ठाकूर हे मतदारसंघ नसताना त्या ठिकाणी आले. हे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. पैशाचा एकही गुन्हा दाखल झालेला नाही”, असं विनोद तावडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.