मराठी पाटय़ा आणि बोलण्यावरून मुंबईतील व्यापारी आणि व्यावसायिकांना सल्ले देणारे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले. आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवतात आणि दुसरीकडे मराठीचा केवळ देखावा करतात, असा टोला ठाकरे यांनी लगावला.
नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्णात झालेल्या नुकसानीची पाहणी मंगळवारी ठाकरे यांनी केली. गारपीट व अवकाळी पावसामुळे ज्या भागात सर्वाधिक नुकसान झाले, तेथील शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. नैसर्गिक आपत्तीमुळे आत्महत्या करणाऱ्या निफाड तालुक्यातील कापसे यांच्या कुटुंबियांना एक लाखाची मदत काँग्रेसकडून देण्यात आली. हा दौरा आटोपल्यानंतर विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी नैसर्गिक आपत्तीने कोलमडलेल्या शेतकऱ्यांना भाजप-सेना युती शासनाने मदतीचा आधार दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला. अलीकडेच मुंबई येथे शिक्षणमंत्री तावडे यांनी मराठी पाटय़ांवरून विधान केले होते. दुकानांवर केवळ मराठी पाटय़ा न लावता मराठी भाषा देखील बोलता येणे गरजेचे आहे असे त्यांनी म्हटले होते. यावर उपस्थित झालेल्या प्रश्नावर ठाकरे यांनी मराठीच्या मुद्यावरून राजकारण हा निव्वळ देखावा असल्याचे नमूद केले. पालघर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने युती केली होती. विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणारे हे पक्ष कसे एकत्र आले या प्रश्नावर बोलताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आल्याचे ठाकरे यांनी नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा