Vinod Tawde : राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीसह सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरु करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात सभा आणि मेळावे सुरु आहेत. या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे हे देखील महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात दौरे करत आहेत. यातच महायुतीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? याबाबत अद्याप नाव जाहीर केलेलं नाही. मात्र, यावरून गेल्या काही दिवसांपासून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
यातच आज विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत सूचक भाष्य केलं. ‘भारतीय जनता पक्षात ज्या नावांची चर्चा असते ते मु्ख्यमंत्री होत नाहीत. माझ्या नावाची चर्चा मग मी होणार नाही हे नक्की’, असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी राजस्थान आणि मध्य प्रदेशचं उदाहरण दिलं आहे.
विनोद तावडे काय म्हणाले?
“विधानसभेच्या निवडणुकीत महायुती जिंकेल आणि महायुतीचा मुख्यमंत्री होईल. भारतीय जनता पक्षात ज्या नावाची चर्चा मुख्यमंत्रिपदासाठी होते. ते कधी मुख्यमंत्री होत नाहीत. हे पक्क लक्षात ठेवा. काही काळजी करू नका. तुम्हाला राजस्थानचे भजनलाल शर्मा माहिती होते?, मोहन यादव माहिती होते? ओडीशाचे माहिती होते का? त्यामुळे माझ्या नावाची चर्चा झाली ना? याचा अर्थ मी नक्की होणार नाही हे ठरवा. बाकी बघू”, असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. याबाबत अनेकदा वेगवेगळे तर्कवितर्कही लावले जात आहेत. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीआधी महायुती आणि महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. त्यामुळे आता निवडणुकीनंतर नेमकी कोण मुख्यमंत्री होतं? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.