सिद्धेश्वराच्या हेमाडपंती मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या होट्टल (ता. देगलूर) येथे गावाच्या बाहेर एका प्राचीन मंदिरात शिविपड सापडली असून, तहसीलदारांच्या सूचनेनुसार पुरातत्त्व विभागाच्या प्रतिनिधीने तिथे भेट देऊन ती न हलवण्याबाबत ग्रामस्थांना सूचित केले. त्यानंतर ग्रामस्थांनी शिविपडीची विधिवत पूजा केली. दरम्यान पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षाने या भागातील प्राचीन अवशेष अजूनही लुप्त अवस्थेत असून, या विभागाने कालबद्ध कार्यक्रम आखून प्राचीन ठेवा लोकांसमोर आणावा, अशी मागणी होत आहे.
होट्टल येथेही सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. अलीकडे या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. दरम्यान, पोळय़ाच्या दिवशी काही ग्रामस्थ गावालगत पूर्वेला मोकळय़ा जागेत बसले असता, मातीखाली काहीतरी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हाताने माती बाजूला केली असता, मंदिरासारखी वास्तू असल्याचे जाणवले. त्यानंतर ही बाब तहसीलदारांना कळविण्यात आली. तहसीलदार यांनी पुरातत्त्व विभागाशी संपर्क साधल्यानंतर या विभागाचे नांदेड येथील कर्मचारी निजामुद्दीन होट्टल येथे पोहोचले. त्यांनी पिंड ‘जैसे थे’ स्थितीत ठेवण्याची सूचना केली. त्यानुसार पिंड तशीच ठेवून त्याची विधिवत पूजाअर्चा करून महाप्रसाद करण्यात आल्याचे निजामुद्दीन यांनी सांगितले. गावाच्या पूर्वेला शिवारात हे मंदिर असल्याचे सांगून निजामुद्दीन म्हणाले, अंदाजे ८०० वर्षांपूर्वीचे हे शिविलग असून त्याचा आकार अंदाचे चार बाय चार फूट असावा. या बाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आली आहे.
बारकाईने उत्खननाची गरज- डॉ. देशमुख
होट्टल येथे आढळलेल्या शिविपडीबाबत इतिहासाचे अभ्यासक डॉ. किरण देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, होट्टल येथे चालुक्य काळातील सिद्धेश्वर आणि पार्वतीचे मंदिर आहे. या दोन्ही मंदिरांचा जीर्णोद्धार झाला, परंतु गावाबाहेर आणखी एक मंदिर असून त्या परिसरात बारकाईने उत्खनन होण्याची आवश्यकता आहे.