धाराशिव : मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे-पाटील यांच्या आवाहनानुसार जिल्हाभरात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. परंतु जिल्ह्यात शिवजयंती व विविध सण-उत्सवांमुळे जमावबंदी आदेश लागू होते. रास्ता रोको आंदोलनामुळे या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर जिल्हाभरातील सव्वाशेहून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
धाराशिव शहरात सांजा बस थांब्यावर बाजीराव सूर्यवंशी, सतीश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे धाराशिव ते औसा जाणार्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक प्रवाशांना यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान पोलिसांनी जमावबंदी आदेशाची आंदोलकांना कल्पना देवूनही आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने १० जणांवर आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शिंगोली येथेही धाराशिव ते शिंगोली जाणारे रोडवर शासकीय विश्रामगृह येथे सगेसोयरेचा अध्यादेश व मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीकरीता सार्वजनिक रस्ता आडवून जिल्हा दंडाधिकार्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. याप्रकरणी पोलीस अंमलदार हनुमंत जालिंदर म्हेत्रे यांच्या फिर्यादीवरून दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभास्थळी निर्माणाधीन मंडप कोसळला, चार जण जखमी
वाशी पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या पारा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पिंपळगाव-कळंब रोडवर सार्वजनिक रस्ता अडवून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणार्या बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच घाटनांदूर येथे आंदोलन करणार्या सात जणांनी बसस्थानकासमोरील ईट ते भूम रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. याप्रकरणी अकरा जणांविरूध्द वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर राष्ट्रीय महामार्ग अडविणार्या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमरगा पोलीस ठाण्याअंतर्गत येणार्या हैद्राबाद ते सोलापूर महामार्ग व लातूर ते कलबुर्गी या राज्यमार्गावर रास्ता रोको करणार्या वीसपेक्षा अधिक जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहारा तालुक्यातील हिप्परगा येथील गावाच्या प्रवेशद्वारासमोर रस्ता अडवून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सात, तसेच रस्त्यात टायर जाळून रहदारीस अडथळा करुन रास्ता रोको आंदोलन करणार्या जेवळी येथील सहा जणांविरूध्द लोहारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळंब तालुक्यातील तांदुळवाडी येथील चार जणांनी कळंब ते येडशी रोडवर रस्ता अडवून आदेशाचे उल्लंघन करुन रास्ता रोको आंदोलन केले. तसेच सहा जणांनी कळंब ते पारा रोडवर गंभीरवाडी येथे, ईटकूर येथील पाच जणांनी इटकूर येथे रास्ता रोको आंदोलन केले. त्याचप्रकारे बेंबळी पोलीस ठाण्यांतर्गत जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बेंबळीतील १५ आणि रूईभर येथील १४ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत २० जणांनी वाघोली येथे आंदोलन केले. तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा येथील चार, भूम तालुक्यातील चिंचोली येथे २५ जणांनी रास्ता रोको आंदोलन करून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पन्नासवर आरोपी महाविद्यालयीन विद्यार्थी
शनिवारी मराठायोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार करण्यात आलेल्या जिल्हाभरातील रास्ता रोको आंदोलनामुळे संबंधित पोलीस ठाण्यात सव्वाशेवर आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल झालेल्या या आरोपींपैकी पन्नासवर आरोपी महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. त्यामुळे त्यांचे शासकीय नोकरभरतीच्यावेळी नुकसान होण्याची शक्यता आहे. सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची जाहीर मागणी जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे. राज्य सरकार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.