आरटीईच्या निकषानुसार मूलभूत शैक्षणिक सुविधा उपलब्ध नसलेल्या जिल्हय़ातील २०८ प्राथमिक शाळांना अद्यापि मान्यता प्रमाणपत्र मिळालेले नाही. पैकी ८८ शाळा येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे. मात्र तरीही शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे या शाळांमधून विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांची फसगत होण्याची शक्यता असल्याकडे लक्ष वेधले जात आहे. यामध्ये नगर शहरातील सर्वाधिक ३५ शाळांचा व त्यात काही प्रतिष्ठित शाळांचाही समावेश आहे.
प्राथमिक शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार अ.ए.सो.ची फिरोदिया इंग्रजी माध्यम शाळा, प्रोग्रेसिव्ह प्रायमरी स्कूल, शारदा विद्या मंदिर, समर्थ विद्या मंदिर, कै. वि. ल. कुलकर्णी प्राथमिक शाळा, पी. ए. इनामदार प्रायमरी स्कूल, शांतिपूर प्राथमिक शाळा, ब्लुमिंग बर्ड, महाराष्ट्र पब्लिक स्कूल, जीवनज्योती इंग्रजी माध्यम शाळा, बत्तीन पोटय़न्ना स्कूल, अंकुर प्राथमिक शाळा, नूतन मराठी शाळा, सेंट झेव्हिअर्स, जय बजरंग, काकासाहेब म्हस्के प्राथमिक शाळा आदींना शाळा सुरू ठेवण्यासाठीचे मान्यता प्रमाणपत्र अद्याप शिक्षण विभागाने दिलेले नाही. यातील अनेक शाळांमध्ये सध्या प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आली आहे.
बालकांच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रत्येक शाळांना दर तीन वर्षांनी शाळा सुरू ठेवण्यासाठी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच या शाळांनी मूलभूत शैक्षणिक सुविधांची ११ मानांकने पूर्ण केलेली हवीत, त्याशिवाय हे प्रमाणपत्र दिले जाणार नाही. विद्यार्थी व शिक्षकसंख्येच्या प्रमाणात वर्गखोल्यांची उपलब्धता, रँप, मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, अध्यापन व खेळाचे पुरेसे साहित्य, मैदान, ग्रंथालय, मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र खोली, स्वयंपाकगृह हे निकष आहेत.
गेल्या वर्षीपर्यंत झालेल्या झालेल्या तपासणीत जिल्हय़ातील २०८ शाळांनी या सुविधांची पूर्तता केली नसल्याने त्यांना शाळा सुरू ठेवण्यासाठीचे प्रमाणपत्र दिले गेलेले नाही. त्यांचे अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या तालुका समित्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवले आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व शिक्षण संचालकांना अहवाल दिले. नगर शहर ३५, नगर तालुका ९, पारनेर १०, श्रीगोंदे ३२, कर्जत १, जामखेड २१, पाथर्डी ३०, शेवगाव २४, नेवासे ३, राहुरी २१, राहाता १ व अकोले २१ अशा एकूण २०८ शाळा आहेत. नगर शहरातील बहुतेक शाळांकडे स्वत:ची मैदाने नाहीत. अनेकांनी करार पद्धतीने मैदाने घेतली आहेत.
वारंवार नोटिसा दिल्यानंतर आता या २०८ मधील १२० शाळांनी निकषांची पूर्तता केली असल्याचा दावा या शाळांच्या संस्थांनी केला आहे. प्रत्यक्षात मात्र त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. उर्वरित ८८ शाळांना अखेरची संधी मिळणार आहे. त्याची तपासणी आचारसंहिता संपताच केली जाणार आहे. निकष पूर्ण न केलेल्या शाळांना येत्या शैक्षणिक वर्षांपासून शाळा सुरू ठेवता येणार नाही, असे शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या शाळांनी निकष पूर्ण केल्यानंतरही त्यांना सन २०१६ पर्यंतच शाळा सुरू ठेवण्याचे प्रमाणपत्र मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा