जिल्ह्यात गेल्या वर्षभरात महिला अत्याचार आणि खूनाच्या गुन्ह्यामध्ये वाढ झाली असल्याची माहिती पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत महिला अत्याचारामध्ये २१ टक्क्यानी तर अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये ७ टक्क्यानी वाढ झाली असून लैंगिक अत्याचाराचा एक गुन्हा वगळता अन्य सर्व संशयितांना अटक करण्यात आली आहे. अधिक्षक डॉ.तेली यांनी गेल्या एक वर्षाच्या कालावधीत पोलीस कामगिरीचा आढावा घेताना सांगितले, गेल्या वर्षी जिल्ह्यात बलात्काराच्या १४५ घटना घडल्या होत्या, तर डिसेंबर अखेर जिल्ह्यात १६६ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले. तर अपहरणाचे यंदा २९७ गुन्हे दाखल झाले यापैकी २३८ प्रकरणाचा शोध लावण्यात यश आले असून या पैकी बहुसंख्य प्रकरणे प्रेमसंबंधातून असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा >>> सांगली : विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकाला मनसे कार्यकर्त्यांकडून चोप
गेल्या एक वर्षात ६९ जणांचे खूनाचे गुन्हे दाखल झाले असून या सर्वच प्रकरणाचा तपास करून संशयितांना अटक करण्यात आली असून आर्थिक, जमिन या कारणावरून खूनाचे प्रकार वाढले असल्याचे आढळून आले आहे. तर दरोडा, चोरी यामध्ये घट झाली असून पोलीसांचे पेट्रोलिंगमुळे या प्रकाराना आळा घालण्यात यश आले आहे. रिलायन्स ज्वेल्सवर भरदिवसा परप्रांतीय टोळींने टाकलेल्या दरोड्याचा तपास सांगली पोलीसांना आव्हान देणारा होता. या तपासातील टोळी उघडकीस आली असून चौघांना अटक करण्यात आली आहे. मात्र, दरोड्यात लंपास करण्यात आलेले साडेसहा कोटींचा ऐवज हस्तगत करण्यात अद्याप यश आलेले नाही. अशाच पध्दतीने डेहराडून येथे रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा टाकण्यात आला होता. दोन्ही गुन्हे एकाच टोळीेने केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून डेहराडून व सांगली पोलीस संयुक्तपणे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत असेही त्यांनी सांगितले.