अमरावतीत भाजपानं बंदचं आवाहन केलं. यानंतर आज (१३ नोव्हेंबर) पाळण्यात येत असलेल्या बंदला हिंसक वळण लागलं. आक्रमक आंदोलकांनी या दुकानांवर दगडफेक करत तोडफोड केली. यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत दगडफेक करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात तरुणांचा सहभाग आहे.
अमरावतीत बंदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज्य राखीव पोलीस दलही चौकाचौकात तैनात करण्यात आलं. मात्र, असं असतानाही समोर आलेल्या दृष्यांनुसार आंदोलक बंद दुकानांची कुलुपं तोडून तोडफोड करत असल्याचंही दिसत आहे. तसेच दुकानांबाहेरील साहित्याचंही नुकसान केलं जातंय. त्यामुळे आक्रमक आंदोलकांसमोर पोलीस यंत्रणा तोकडी पडत असल्याचं चित्र आहे. नागपूरचे पोलीस महासंचालक संदीप पाटील हे अमरावतीत दाखल झाले आहेत. त्यांनी या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय?
त्रिपुरा राज्यात झालेल्या अत्याचारा विरोधात अमरावतीत १२ नोव्हेंबर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर 15 ते 20 हजार लोकांनी निषेध मोर्चा काढला होता. मात्र या मोर्चाला हिंसक वळण लागले. यात अमरावती शहरातील २० ते २२ दुकानात तोडफोड झाली. काही दुकानादारांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता तर कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न देखील निर्माण झाला. या मोर्चा विरोधात भाजपाने अमरावती शहर बंदचे आवाहन केलं. मात्र, या बंद दरम्यान आंदोलकांनी हिंसा केली.
सखोल चौकशी होईल, कोणीही याला राजकीय वळन देऊ नये : यशोमती ठाकूर
यावर अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जनतेला शांततेच आवाहन केलं आहे. “कोणीही सामान्य जनतेला वेठीस धरू नये. अमरावतीच्या घटनेची सखोल चौकशी होईल. याला कोणीही राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये. सर्वांनी शांतता राखावी,” असं आवाहन अमरावतीच्या पालकमंत्री व महिला, बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं.
पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. तसेच गृहमंत्री स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत परिस्थितीवर देखरेख ठेवून आहेत. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगावा असे सर्व हिंदू व मुस्लीम बांधवांना कळकळीचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.
हेही वाचा : मालेगाव, नांदेड, अमरावतीत दगडफेक; त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ सुरू होता बंद!
यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले असून या परिस्थितीत आपण सगळ्यांनी सामाजिक ऐक्य राखणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी जनतेला केली आहे. गृहमंत्र्यांनी पोलिस बांधवांनाही परिस्थिती संयमाने हाताळण्याचे आणि राज्यामध्ये शांतता कशी राहील यादृष्टीने कार्य करण्याचे आवाहन केले आहे.