विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयामध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये करोनाची बाधा झालेल्या १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. असं असतानाच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही दुर्घटना राज्य सरकारच्या अंतर्गत बाब असून राष्ट्रीय स्तरावरील बातमी नसल्याचं म्हटलं आहे. पत्रकारांनी राजेश टोपे यांना पंतप्रधान मोदींसोबत होणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता टोपे यांनी अनेक विषयांबद्दल पंतप्रधनांशी चर्चा करणार असलो तरी विरार दुर्घटना ही राष्ट्रीय बातमी नसल्याने आम्ही महापालिका स्तरावर आणि राज्य स्तरावर त्यासंदर्भात निर्णय घेऊन मदत करु, असं पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

“पंतप्रधान मोदींशी ऑक्सिजनसंदर्भात बोलणार आहोत. रेमडिसिविरसंदर्भात बोलणार आहोत. ही घटना (विरार रुग्णालय आग) ही राष्ट्रीय बातमी नाहीय. आम्ही राज्य सरकारच्या वतीने पूर्णपणे मदत करणार आहोत,” असं टोपेंनी सांगितलं. त्यावर पत्रकाराने १३ जणांचा मृत्यू झाला ही राष्ट्रीय बातमी नाहीय का?, असं विचारलं. यावर उत्तर देताना, “अरे बाबा, राज्य सरकारच्या अंतर्गत आम्ही पूर्ण मदत करणार आहोत. यामध्ये महापालिकेकडून ५ लाखांची, राज्य सरकारकडून पाच लाखांची अशी दहा लाखांची मदत देणार आहोत. नाशिकमधील घटनेप्रमाणेच इथेही मदत दिली जाईल. कोणत्याही इमारतीचे फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट आणि इलेक्ट्रीकल ऑडिट करणं आवश्यक असतं. हे नियम न पाळणाऱ्या आणि त्यासंदर्भात दोषी असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणात सखोल चौकशी केली जाणार आहे. १० दिवसात यासंदर्भात अहवाल सादर केला जाईल. घडलेली घटना दुर्देवी आहे. आमच्या सद्भभावना मृतांच्या नातेवाईकांसोबत आहेत,” असं टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

“विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात अतिदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आग विझवणे व इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले,” अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करत दिली आहे. “उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये याकडे लक्ष देत त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. या खासगी रुग्णालयात अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत,” अशी माहिती देण्यात आली आहे.

Story img Loader