केंद्रीय लोकसेवा आयोग, विद्यापीठ परीक्षा आणि दहावी-बारावी परीक्षांतील गोंधळाचा विद्यार्थ्यांना फटका बसत असतानाच या गोंधळाची लागण राज्य लोकसेवा आयोगालाही (एमपीएससी) झाली आहे. एमपीएससीच्या संकेतस्थळात व्हायरस शिरल्यामुळे राज्य सेवा पूर्वपरीक्षेसाठी बसलेल्या सर्व उमेदवारांची माहिती परीक्षेच्या तोंडावरच नष्ट झाली आहे. उमेदवारांना त्यांची माहिती पुन्हा भरण्याची सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केली असून, त्यासाठी केवळ दोनच दिवसांची मुदत देण्यात आल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या तयारीऐवजी माहिती भरण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे.
लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा पूर्वपरीक्षेसाठी यावर्षी साधारण साडेतीन लाख उमेदवार बसले आहेत. ही परीक्षा ७ एप्रिलला होणार आहे. मात्र, ‘व्हायरस’मुळे आयोगाच्या संकेतस्थळावरील विद्यार्थ्यांची सर्व माहितीच नष्ट झाली आहे. उमेदवारांनी ४ एप्रिल सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व माहिती भरावी अन्यथा उमेदवारांना परीक्षेचे हॉल तिकीट देण्यात येणार नाही, असे सूचनापत्र आयोगाने काढले आहे. मात्र, पुन्हा सर्व माहिती भरताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. माहिती भरत असताना अॅप्लिकेशन अॅड्रेस विचारण्यात येत आहे. मात्र, ज्या उमेदवारांनी ऑनलाइन शुल्क भरले आहे, त्यांच्याकडे अॅप्लिकेशन अॅड्रेस नसल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना माहिती भरता येणे शक्य नाही.  यावर्षी प्रथमच नवीन परीक्षा पद्धतीला सामोरे जायचे असल्यामुळे आधीपासूनच तणावाखाली असलेल्या उमेदवारांना परीक्षा तोंडावर आलेली असताना आपली माहिती भरण्यासाठी सतत क्रॅश होणाऱ्या संकेतस्थळाबरोबर झटापट करावी लागणार आहे.
विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर येऊन अर्जाच्या प्रतीमधून आपला अर्ज शोधावा, असा पर्याय आयोगाने विद्यार्थ्यांसमोर ठेवला आहे. मात्र, मुळात परीक्षेचे प्रवेश पत्रच नसल्यामुळे उमेदवारांना त्यांच्या केंद्राची माहिती मिळणे शक्य नाही. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्या केंद्रावर जायचे आणि अर्ज शोधायचा कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
परीक्षा वेळेतच होणार
व्हायरसने हल्ला केल्यामुळे उमेदवारांची माहिती नष्ट झाली आहे. त्यामुळे उमेदवारांनी पुन्हा माहिती भरावी अशी सूचना देण्यात आली आहे. आमच्याकडे उमेदवारांच्या अर्जाच्या प्रती आहेत, पण कालावधी कमी असल्यामुळे त्यातील माहितीवरून प्रवेशपत्र बनवणे शक्य नाही. त्यामुळे प्रवेशपत्र तयार करण्यासाठी उमेदवारांकडून माहिती मागितली आहे. ज्या उमेदवारांना प्रवेशपत्र मिळणार नाही, त्यांनी परीक्षा केंद्रावर जाऊन आपला अर्ज शोधून ओळख पटवून परीक्षेला बसावे. परीक्षेला सगळ्या विद्यार्थ्यांना बसता येईल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही.    – सुधीर ठाकरे, एमपीएससीचे अध्यक्ष
एसएमएसच्या माध्यमातून
ट्रान्झॉक्शन नंबर
ट्रान्झॉक्शन नंबर नसल्यामुळे पुन्हा माहिती भरण्यामध्ये उमेदवारांना अडचणी येत आहेत. आयोगाकडे असलेल्या उमेदवारांच्या अर्जाच्या प्रतींमध्ये ज्या उमेदवारांचे मोबाइल क्रमांक आहेत त्यांचा ट्रान्झॉक्शन नंबर एसएमएसच्या माध्यमातून पाठविण्यात येणार असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.