गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत रविवारी मोठ्या उत्साहात सांगलीतील संस्थान गणपतीला निरोप देण्यात आला. राजवाड्यातील दरबार हॉलपासून गणेश मंदिर मार्गावरून शाही थाटात सजविलेल्या रथातून श्रींची विसर्जन मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये लेझीम व झांजपथकासह टाळमृदंगाचा गजर होता.
यंदा निर्बंध हटविण्यात आल्याने शाही मिरवणुक उत्साहात काढण्यात आली. दुपारी विधीवत आरती झाल्यानंतर दरबार हॉलमधून श्रींची पालखीतून विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीमध्ये विजयसिंह राजे पटवर्धन यांच्यासह पटवर्धन परिवार, आ. सुधीर गाडगीळ, महापौर दिग्विजय सुर्यवंशी, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका जयश्री पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यासह अधिक्षक दीक्षित गेडाम, अप्पर अधिक्षक मनिषा दुबुले आदी सहभागी झाले होते.
मिरवणुकीमध्ये टाळ-मृदंगासह वारकरी, लेझीम पथक, झांज पथक सहभागी झाले होते. गणेश मंदिराजवळ आल्यानंतर पुन्हा श्रींचे पूजन करण्यात आले. गणेश मंदिरापासून टिळक स्मारक मंदिरमार्गे संस्थान गणेशाचे सरकारी घाटावर सुर्यास्तावेळी कृष्णा नदीमध्ये विसर्जन करण्यात आले.
संस्थान गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर अनेक घरगुती मंडळांच्या श्रींचे विसर्जन कृष्णा नदीमध्ये करण्यासाठी गर्दी झाली होती. यावेळी महापालिकेने विविध ठिकाणी विसर्जनासाठी विसर्जन कुंडांची निर्मितीही केली होती.
हेही वाचा : गौरीपूजनानंतर महिलांनी केला पारंपरिक लोकगीतांचा जागर
तसेच मुर्ती दानाचा उपक्रमही राबविण्यात आला. विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य कुंडही ठेवण्यात आले होते. मिरज, कुपवाड शहरात 67 सार्वजनिक मंडळाच्या गणेशाचे विसर्जन आज करण्यात आले. मिरजेतील गणेश तलावामध्ये विसर्जनासाठी महापालिकेने व्यवस्था केली आहे. उत्सव शांततेत पार पडावा यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.