वाई : पुणे कल्याणीनगर प्रकरणात अल्पवयीन मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात अटकेत असलेल्या अगरवाल पिता-पुत्राची व्यावसायिक कृत्येही आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. महाबळेश्वर येथील सरकारी जागेवर भाडेतत्त्वाने चालवण्यात येणाऱ्या पारसी जिमखान्याच्या विश्वस्त मंडळात प्रवेश करून नंतर ती जागाच अगरवाल कुटुंबातील व्यक्तींनी बळकावल्याचा आरोप होत आहे. या ठिकाणी तारांकित क्लबही सुरू करण्यात आला असून या जागेवर आता कारवाई सुरू झाली आहे.

पारशी जिमखान्याची जागा बळकावण्याच्या अगरवाल कुटुंबाच्या प्रयत्नांविरोधात स्थानिकांनी तक्रारी केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. सध्या सातारा येथील आपल्या गावी सुट्टीसाठी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या तक्रारींची दखल घेऊन या अनधिकृत बांधकामाची चौकशी करण्याचे आदेश साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

महाबळेश्वर येथील जुना तापोळा रस्त्यावर पारशी जिमखाना ट्रस्टला तीस वर्षांच्या भाडेकराराने जवळपास चार एकर जागा देण्यात आली आहे. ब्रिटिशकाळात देण्यात आलेल्या या जागेच्या भाडेपट्ट्याचे वेळोवेळी नूतनीकरण करण्यात आले आहे. सध्या या ठिकाणी लावलेल्या भाडेपट्टा मिळकत फलकानुसार ३० मार्च २०१५ रोजी ३० वर्षांच्या कालावधीसाठी रहिवास वापराकरिता पारशी जिमखान्याला ही जागा देण्यात आली. पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल आणि उषा अगरवाल यांना २०१६मध्ये जिमखान्याच्या विश्वस्त मंडळात सामील करून घेण्यात आले. मात्र, त्यानंतर चारच वर्षांत जिमखान्याच्या मूळ विश्वस्त मंडळातील इतरांची नावे कमी होऊन त्या ठिकाणी अगरवाल कुटुंबातील अन्य व्यक्तींची नावे विश्वस्त म्हणून दाखल करण्यात आली. त्यापाठोपाठ या मिळकतीपैकी काही भागावर ‘एमपीजी क्लब’ नावाने तारांकित हॉटेल आणि स्पा सुरू करून त्याचा वाणिज्यिक वापर सुरू करण्यात आला.

हेही वाचा >>> पंढरपूर-शेटफळ रस्त्यावर अपघातात चौघांचा मृत्यू; अन्य चौघे जखमी

जिमखान्याला रहिवास वापरासाठी देण्यात आलेल्या जमिनीचा वापर बदल करून व्यावसायिक वापर करण्यात आल्याचे दिसताच महाबळेश्वरमधील सामाजिक कार्यकर्ते अभय हवालदार यांनी एप्रिल महिन्यात महाबळेश्वर गिरिस्थान पालिका, तहसीलदार, वाई प्रांताधिकारी आणि सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. शासनाशी झालेल्या कराराप्रमाणे जागेचा वापर होत नसल्याने ही जागा ताबडतोब शासनाने ताब्यात घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर अगरवाल कुटुंब चर्चेत आल्यानंतर महाबळेश्वरमधील जागा बळकावल्याचे हे प्रकरण पुन ऐरणीवर आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या साताऱ्यातील आपल्या मूळ गावी मुक्कामाला असून तेथे पत्रकारांनी त्यांना या प्रकरणाबाबत विचारणा केली असता त्यांनी या अनधिकृत बांधकामाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. याबाबत साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, अनधिकृत बांधकामाबाबत असलेल्या तक्रारींनुसार महाबळेश्वर मुख्याधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. वृक्षतोडीबाबतही मुख्याधिकाऱ्यांना तातडीने अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

स्थानिक प्रशासनाची कारवाई

जिमखान्याच्या जागेत विनापरवाना चालवण्यात येणाऱ्या बारवर गुरुवारी सायंकाळी कारवाई करून सील ठोकण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. ‘ ज्या कारणासाठी ही जागा क्लबला देण्यात आलेली होती, त्या कारणासाठी या जागेचा वापर होत नाही. त्यामुळे नियमानुसार काय असेल, ती कारवाई करण्यात येईल,’ असे वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी सांगितले तर, ‘एमपीजी क्लब’ची सर्व कागदपत्रे तपासण्यात येत असल्याचे महाबळेश्वर गिरिस्थान पालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी सांगितले.

महाबळेश्वरमध्ये जो कोणी बेकायदा बांधकाम करत असेल किंवा रिसॉर्ट बांधत असेल; मग तो अगरवाल असेल अथवा अन्य कोणी कितीही मोठा असू दे, त्याच्या बेकायदा बांधकामावर बुलडोझर फिरवा, अशा सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

Story img Loader