उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आज त्यांचे लोकसभा निवडणुकीचे १७ उमेदवार जाहीर केले आहेत. आज सकाळीच संजय राऊत यांनी १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यावरुन काँग्रेस नेते चांगलेच नाराज झाले आहेत. बाळासाहेब थोरात, संजय निरुपम आणि विजय वडेट्टीवार यांनी उद्धव ठाकरेंना आघाडी धर्माची आठवण करुन दिली आहे. अशात सांगलीच्या विशाल पाटील यांनी उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढवली आहे.
आज महाराष्ट्रातल्या शिवसेना ठाकरे गटाने १७ उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीहून उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीनंतर काँग्रेसने शिवसेना ठाकरे गटाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ठाकरेंनी आघाडी धर्म पाळला नाही असा आरोप काँग्रेसने केला आहे. चंद्रहार पाटील यांचंही एक वक्तव्य काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. जर मविआने मला उमेदवारी दिली तर विशाल पाटील यांनी माझा प्रचार करावा. जर विशाल पाटील यांना उमेदवारी दिली तर मी त्यांचा प्रचार करेन. मात्र आज यादीत थेट चंद्रहार पाटील नाव आल्याने काँग्रेसने राग व्यक्त केला आहे. अशात विशाल पाटील यांचं वक्तव्य समोर आलं आहे.
काय म्हटलं आहे विकास पाटील यांनी?
“ही पहिली सार्वत्रिक निवडणूक आहे ज्यात शिवसेना आघाडीत आहे. पूर्वीपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जागावाटपाची एक पद्धत होती. कुणी कुठली जागा लढवायची हे एकमेकांना माहीत होतं. शिवसेनेने कुठलीही चर्चा केली नाही आणि परस्पर नावं जाहीर केली आहेत. सांगलीतल्या सर्व नेत्यांनी सांगितलं आहे की सांगली आणि इतर जागांवर तडजोड होणार नाही. काँग्रेस हा महाविकास आघाडीतला जबाबदार पक्ष आहे. त्यामुळे चर्चा केल्याशिवाय आम्ही नावं जाहीर करणार नाही. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वात जो निर्णय होईलल त्याची अंमलबजावणी केली जाईल. ” असं विशाल पाटील यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- “उद्धव ठाकरेंचा उमेदवार खिचडी चोर, आम्ही..”, संजय निरुपम यांची बोचरी टीका
पक्षाने आदेश दिला तर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, मैत्रीपूर्ण लढत असो किंवा शत्रुत्वाची लढाई असो काहीही झालं तरी निवडणूक लढणारच असा निर्धार विशाल पाटील यांनी केला आहे. त्यामुळे सांगलीच्या जागेवरुन उद्धव ठाकरेंची अडचण वाढण्याची चिन्ह आहेत.
विश्वजीत कदम काय म्हणाले?
आज आ्म्ही मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेतली. सांगली हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. मित्र पक्षांना ही जागा काँग्रेससाठी सोडण्यास सांगितलं होतं. आता पुन्हा तीच विनंती करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत.कोल्हापूरच्या जागेवर शाहू महाराज निर्णय घेतील त्या पक्षाकडे जागा जाईल असंही ठरलं होतं. मात्र शिवसेनेने जागा जाहीर केली. असं विश्वजीत कदम म्हणाले आहेत.