देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला जो त्रास दिला, त्याचा बदला मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीत घेतला, असं विधान सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी केलं आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर आज सांगलीत विशाल पाटील यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. तसेच राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसचे सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नेमकं काय म्हणाले विशाल पाटील?
जातीयवादी राजकारणाचा आणि धनशक्तीचा पराभव आपण करू शकतो, हे आता लोकांचा समजून आलं आहे. या निवडणुकीत सांगली शहरातल्या मुस्लीम आणि इतर समाजातील लोकांनी आम्हाला भरभरून मतदान केलं आहे. सांगलीमध्ये जैन समाज मोठ्या प्रमाणात आहे. तसेच शेतकरी वर्गदेखील मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, त्यांच्या मागण्या आणि अडचणींकडे कायम दुर्लक्ष करण्यात आलं आहे, त्यामुळे त्यांनी आम्हाला मतदान केलं, असं विशाल पाटील म्हणाले.
हेही वाचा – ओळख नवीन खासदारांची : विशाल पाटील (सांगली, अपक्ष) ; वसंतदादाचे वारसदार !
पुढे बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केलं, या शहरात मराठा समाजही मोठ्या प्रमाणात आहे. देवेंद्र फडणवीसांनी ज्याप्रमाणे मराठा समाजाला आणि मनोज जरांगे यांना त्रास दिला, ते मराठा समाजाला आवडलेलं नाही. देवेंद्र फडणवीसांनी त्यांना ज्याप्रमाणे वाईट वागणूक दिली. त्याचा बदला मराठा समाजाने घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे, अशी टीका त्यांनी केली.
यावेळी बोलताना त्यांनी राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसचं सरकार येईल, अशा विश्वासही व्यक्त केला. आगामी विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाचे चार ते पाच आमदार निवडून आणायचे आहेत. आपल्याला या राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसचं आणि वसंतदादांच्या विचारांचं सरकार आणायचं आहे. वसंत दादांच्या विचारांचा मुख्यमंत्री या राज्यात पुन्हा एकदा झाला पाहिजे, सांगली जिल्ह्याचा माणूस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाला पाहिजे. यासाठी तुम्हाला आपल्याला सगळ्यांनाच एक होऊन काम करावं लागेल, असे ते म्हणाले.
हेही वाचा – “वरळीत पुन्हा निवडणुकीला उभे राहतात की घाबरून…”, श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला
आज फक्त मी नाही, सांगलीतला प्रत्येक जण खासदार म्हणून निवडून आलेला आहे. मला तुम्ही निवडून दिले आहे. आता तुमच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात आपण संपर्क कार्यालय सुरू करणार आहोत. आपल्या सगळ्यांनी काँग्रेस पक्षाचा विचार हा घरोघरी पोहोचवायचा आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.