Vishal Patil : लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून मोठा वाद निर्माण झाला होता. सांगलीची जागा काँग्रेसला द्यावी अशी मागणी काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी केली होती. मात्र, ही जागा अखेर ठाकरे गटाच्या वाट्याला आली. त्यानंतर विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत त्यांनी भाजपा तसेच ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव करत दणदणीत विजयसुद्धा मिळवला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नाराजीही व्यक्त केली होती. दरम्यान, आता खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरे हे सध्या तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर असून ते आज काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. तत्पूर्वी अपक्ष खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवादही साधला. यावेळी बोलताना विशाल पाटील यांनी जे झालं ते विसरून आम्हाला पुढे जायचं आहे. आम्ही आगामी विधानसभा निडणुकीवर लक्ष केंद्रीत करत आहोत, अशी प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – Uddhav Thackeray on Vishal Patil: “जर विशाल पाटील खात्री देणार असतील की…”, उद्धव ठाकरेंचं सांगली निवडणुकीबाबत मोठं विधान; म्हणाले, “जे झालं ते…”!

नेमकं काय म्हणाले विशाल पाटील?

“आम्ही उद्धव ठाकरे यांनी भेटण्यासाठी वेळ मागितली होती. त्यानुसार काल संजय राऊत यांचा फोन आला आणि त्यांनी आम्हाला भेटण्याची वेळ दिली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आमचं स्वागत केलं आणि त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला. मुळात जे झालं ते विसरून आम्हाला पुढे जायचं आहे. आगामी विधानसभा निडणुकीवर आम्ही लक्ष केंद्रीत केलं आहे. दिल्लीतून भाजपाला हद्दपार करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. यात आम्हाला थोडं फार यशही मिळालं. मात्र, आता महाराष्ट्रातून भाजपाला हद्दपार करायचं आहे. त्यासाठी आम्ही एकजुटीने लढणार आहोत. आता आमच्यात कुठेही कटुता नाही”, असं विशाल पाटील म्हणाले.

“जे काही घडलं ते परिस्थितीमुळे घडलं”

“सांगलीची लढाई ही माझ्यासाठी अस्तित्त्वाची लढाई होती. हे मी अनेकदा सांगितले आहे. उद्धव ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आमचं स्वागत केलं आहे. ते आम्हाला आमच्या वडिलांसमान आहेत. सांगलीत जे झालं त्याचं त्यांना निश्चितच शल्य किंवा खंत असेल. पण जे काही घडलं ते परिस्थितीमुळे घडलं. याचीही त्यांना जाणीव झाली असेल”, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishal patil statement after meeting with uddhav thackeray sangli spb