ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अखिल महाराष्ट्र नाटय़ विद्यामंदिर समितीच्या वतीने दिला जाणारा हा नाटय़ क्षेत्रातील सर्वोच्च बहुमान समजला जातो.
नाटय़ विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी सोमवारी विष्णुदास भावे पुरस्काराची घोषणा केली. ५ नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिनानिमित्त होणाऱ्या विशेष कार्यक्रमात अखिल भारतीय नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते एलकुंचवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. विष्णुदास भावे गौरव पदक, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व रोख ११ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
नाटय़क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या कलावंतांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. एलकुंचवार हे पुरस्कार मिळविणारे ४८ वे कलावंत आहेत. यापूर्वी बालगंधर्व, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, विठाबाई नारायणगावकर, निळू फुले, श्रीमती फैय्याज शेख आदींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
एलकुंचवार यांनी सुलतान, होळी, यातना घर, गाबरे, वासनाकांड, पार्टी, रक्तपुष्प, वाडा चिरेबंदी, प्रतििबब, आत्मकथा, युगान्त, सोनाटा, वासांसी जीर्णानी, धर्मपुत्र आदी नाटय़संहिता लिहिल्या असून बहुतांश नाटके िहदीसह बंगाली, कन्नड, गुजराती, इंग्रजी आदी भाषांत रूपांतरित झाली आहेत. पार्टी, होळी, गाबरे या नाटकांमधून मानवी स्त्री-पुरुषांच्या संबंधाचा वेध घेणाऱ्या नाटकांबरोबरच ‘वाडा चिरेबंदी’सारख्या नाटकातून परंपरेचा वेध घेऊन मानवी नातेसंबंधाबद्दल विचार करायला लावणारी संहिता म्हणून नाटय़ रसिकांत ओळख आहे. त्यांनी विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नाटय़ कलेसंदर्भात होणाऱ्या कार्यशाळेत सहभाग नोंदविला आहे. त्याशिवाय संगीत नाटक अकादमी, महाराष्ट्र गौरव, साहित्य अकादमी, ब्रिटिंगहॅम यूएसए, जनस्थान आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
पुरस्काराने आनंद..
हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद झाला. छान वाटले. त्याचं कारण असं की, १८४२ साली सांगलीतून विष्णुदास भावे यांनी पहिल्या मराठी नाटकाला सुरुवात केली. म्हणूनच सांगलीला जाऊन हा पुरस्कार घेण्याचा विशेष आनंद वाटतो. यापूर्वीही बालगंधर्व, केशवराव दाते, विजयाबाई मेहता अशा अनेक मातब्बरांना हा पुरस्कार मिळालेला असल्यामुळे खरं सांगतो, मलाही हा पुरस्कार मिळाल्याचा खूपच आनंद झालाय, अशी प्रतिक्रिया एलकुंचवार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा