लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीतील जागावाटपाची चर्चा चालू असल्यापासूनच सांगली लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला होता. अगदी निकाल लागेपर्यंत महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेतल्या मतदारसंघांपैकी सांगली एक राहिला. त्याला कारण ठरलं विशाल पाटील यांची बंडखोरी आणि अपक्ष म्हणून मिळवलेला विजय. आश्वासनं देऊनही तिकीट न दिल्याची खंत आणि नाराजी विशाल पाटील व त्यांच्या पाठिशी असणारे काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी जाहीरपणे बोलूनही दाखवली होती. या सर्व घडामोडींसंदर्भात आता विश्वजीत कदम यांनी मोठं भाष्य केलं आहे.
विश्वजीत कदम व विशाल पाटील यांनी एबीपी माझावर दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगली जागेसंदर्भात घडलेल्या घडामोडी आणि त्यामागील राजकारण यावर सविस्तर भाष्य केलं. यावेळी विश्वजीत कदम यांनी त्यांची बाजू मांडताना मोठा दावा केला असून त्यांचा रोख नेमका कुणाच्या दिशेने आहे? यावर आता तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. एकीकडे त्यांनी महाराष्ट्र व केंद्रातील काँग्रेसचे नेतेही सर्वतोपरी तिकिटासाठी प्रयत्न करत होते, असं मान्य केलं. त्यामुळे महाविकासआघाडीतील इतर दोन पक्षांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
काय म्हणाले विश्वजीत कदम?
सांगली जागावाटपासंदर्भात बोलताना विश्वजीत कदम यांनी घटनाक्रम सांगितला. “आम्ही दोघं खूप आधीपासून एकत्र काम करू लागलो होतो. पण गेल्या पाच वर्षांत परिस्थिती बदलली. सांगलीला अनेक धक्के पचवावे लागले. त्यानंतर काँग्रेस पक्षाची जिल्ह्यात आम्हा तरुण पिढीवर जबाबदारी आली. ती आम्ही हळूहळू पार पाडत होतो. पळूस-कडेगावच्या जनतेच्या आशीर्वादावर मी दोन वेळा निवडून आलो. पहिल्याच टर्ममध्ये राज्यमंत्री म्हणून काम करू शकलो”, असं ते म्हणाले.
“गेल्या दीड-दोन वर्षांपासून मी जाणीवपूर्वक जिथे जाईन, तिथे विशाल पाटील यांना घेऊन जात होतो. सगळीकडे त्यांच्या उमेदवारीबाबत सांगत होतो. ती बाब लोकांसमोर सातत्याने मांडत गेलो. गेल्या दीड-दोन वर्षांत मोठमोठे कार्यक्रम केले. भारत जोडोसाठी १०-१२ हजार लोक सांगलीतून हिंगोलीपर्यंत घेऊन गेलो. सिद्धरामय्या मु्ख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा पहिला सत्कार मी सांगलीत केला. त्याला ५-६ दिवसांत ३०-४० हजार लोक मी गोळा केले. तिथेही विशाल पाटलांना उमेदवार म्हणून मी पुढे केलं. त्यातून जिल्ह्यात संदेश गेला होता”, असं सांगताना विशाल पाटील यांची उमेदवारी त्यांनी गृहीत धरली होती, असं त्यांनी नमूद केलं.
“आम्हाला संघर्ष कुणामुळे करावा लागला ते…”
दरम्यान, नैसर्गिक जागेसाठी संघर्ष का करावा लागला याचं उत्तर मिळालंय, असं सूचक विधान विश्वजीत कदम यांनी यावेळी केलं. “आम्हाला वाटत होतं की जिल्ह्यात काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. सर्व स्तरावर काँग्रेसचे कार्यकर्ते काम करत होते. त्यामुळे ही नैसर्गिकरीत्या काँग्रेसची जागा होती हे आम्ही गृहीत धरलं होतं. पण जानेवारीपासून अचानक चित्र बदललं. आम्हाला धडपड आणि संघर्ष करावा लागला. तो का करावा लागला? कुणामुळे करावा लागला? हे आम्हाला कळलं आहे. पण आमच्याहून जास्त सांगलीतल्या लोकांना त्याची उत्तरं मिळाली आहेत”, असं विश्वजीत कदम म्हणाले.
“मला त्रास दिला गेला. विशाल पाटील जिल्ह्याचे खासदार होऊ नयेत, त्यांच्या पाठिशी उभं राहून विश्वजीत कदम त्यांना निवडून आणतील, काँग्रेसचा महाराष्ट्रातला एक खासदार वाढेल, सांगलीचा काँग्रेसचा बालेकिल्ला अबाधित राहील असं काही लोकांना वाटलं. कुठेतरी विश्वजीतचा राज्याच्या राजकारणात वेग वाढतोय हे पाहून ज्यांनी कुणी हे केलं, त्यांनी सांगलीतलं काँग्रेसचं तिकीटच कापलं. मी आणि विशाल पाटील एकत्र आलो तेही काही लोकांना बघवलं नाही. म्हणून हे तिकीट कापलं गेलं. त्याची आम्हाला फार खंत वाटते”, असा थेट दावा विश्वजीत कदम यांनी यावेळी केला.
“सांगलीचा बळी जाईल असं वाटलंच नव्हतं”
आघाडीधर्म पाळताना सांगलीचा बळी दिला जाईल, असं वाटलंच नव्हतं, असं विश्वजीत कदम म्हणाले. “आघाडीधर्म पाळताना चर्चेत आमच्या राज्यातील आणि दिल्लीतील नेत्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. आघाडीचं राजकारण इथे कायमचं राहणार आहे हे दिसतंय. कुठेतरी तडजोडी कराव्याच लागतात. पण सांगलीचा बळी दिला जाईल असं आम्हाला वाटलं नव्हतं. कारण ही हक्काची जागा होती. पण बळी दिला गेला. मी प्रोटोकॉल पाळत होतो, राज्यातल्या, दिल्लीतल्या नेत्यांना भेटत होतो. मविआतल्या नेत्यांकडेही भेटीसाठी वेळ मागत होतो. त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न करत होतो”, अशा शब्दांत विश्वजीत कदम यांनी आपली खंत बोलून दाखवली.
“जे घडलं ते घडलं. पण त्यातून इतरही प्रयत्न झाले. जेव्हा तिकीट जाहीर झालं, त्यानंतरही आम्ही प्रयत्न चालू ठेवले. महाराष्ट्रातल्या नेत्यांनी मला सांगितलं की आपण शेवटपर्यंत प्रयत्न करू. त्यामुळे मीही लावून धरत होतो. मग आम्हाला काही गोष्टी लक्षात आल्या. त्यांना आम्ही सांगितलं आपण दिलेला उमेदवार पैलवान जरी असला तरी राजकीय फड वेगळा असतो. मी पक्षश्रेष्ठींना ठामपणे सांगितलं की मी विशालला अर्ज मागे घ्यायला सांगू शकत नाही”, असं ते म्हणाले.