काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम भाजपाच्या मार्गावर असल्याची जोरदार चर्चा होती. याबाबत अनेक ठिकाणी वृत्तही प्रसारित झाले. त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, आता स्वतः विश्वजीत कदम यांनीच या चर्चांवर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “मला भाजपाच्या पक्षप्रवेशाची ऑफर आहे आणि मी भाजपात जाणार या चुकीच्या बातम्या आहेत. अफवांवर विश्वास ठेऊ नका,” असं मत विश्वजीत कदम यांनी व्यक्त केलं. ते सांगली जिल्ह्यात पलूस तालुक्यातील अंकलखोप विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या शताब्दी सोहळ्यात बोलत होते.
विश्वजीत कदम म्हणाले, “गेल्या दोन दिवसांपासून चुकीच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. माझ्यावर इतका फोकस का आहे मला कळत नाही. माझ्यावर काही लोकांचं अतिप्रेम असू शकेल. म्हणून माझ्यावर फोकस आला असेल. मला एवढंच सांगायचं आहे की, मी कुठल्याही वेगळ्या भूमिकेत, विचारात नाही. पंतगराव कदम आणि मोहन कदम यांच्या आदर्श विचारांचा वारसा माझ्याकडे आहे.”
पाहा व्हिडीओ –
“चुकीच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेऊ नका. या फक्त अफवा आहेत, एवढंच मी सर्वांना सांगू इच्छितो,” असंही विश्वजीत कदम यांनी नमूद केलं.
हेही वाचा : काँग्रेस नेते विश्वजीत कदमांच्या निकटवर्तीच्या घरी सीबीआयचा छापा, राजकीय वर्तुळात खळबळ
महाविकासआघाडी सरकारवर बोलताना ते म्हणाले, “गेल्या महिन्यात अपघात घडला आणि आमचं सरकार गेलं. परंतु मला खात्री आणि विश्वास आहे की, येणाऱ्या काळात पुन्हा आमचं सरकार येईल आणि शेतकरी, ग्रामीण भागातील लोकांच्या सेवेसाठी आम्ही तत्पर राहू.”