माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्याकडे राजकीय परिपक्वतेचा अभाव असून विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघात प्रचार न करणे म्हणजे त्यांची राजकीय शोकांतिका असल्याचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पलूसमध्ये राष्ट्रवादी व भाजपाचे साटेलोटे दिसून आले असले तरी, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे ज्येष्ठ व अभ्यासू नेते असून त्यांच्या दूरदृष्टीचा जनतेला लाभ झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीतील मतदान संपल्यानंतर अस्मिता या बंगल्यावर पत्रकारांशी संवाद साधताना, प्रतीक पाटील यांनी डॉ. कदम यांच्यावर केलेल्या आरोपाचा खरपूस समाचार घेतला. निवडणुकीच्या तोंडावर माजी खा. पाटील यांनी जिल्ह्यातील काँग्रेसच्या पडझडीला जबाबदार असल्याचा आरोप केला होता. माजी खासदार म्हणून जिल्ह्यात काँग्रेस वाढीसाठी त्यांनी काय प्रयत्न केले, असा सवाल करीत त्यांचे वक्तव्य राजकीय पोक्तपणाचे नसून जिल्ह्यातील उमेदवार निश्चिती प्रदेश समितीच्या शिफारसीवर झाली असल्याचे सांगितले.
इस्लामपूर येथे एकास एक उमेदवार देण्याचा निर्णय हा प्रतीक पाटील यांचा व्यक्तिगत निर्णय होता. त्यामध्ये पक्षाचा अथवा डॉ. कदम यांचा संबंध कुठे आला? प्रतीक पाटील यांनी काँग्रेसच्या प्रचारासाठी कोठे सभा घेतल्या हे जाहीर करावे. केवळ आरोप करून जबाबदारी टाळता येणार नाही. निकालानंतर याचा सोक्षमोक्ष पक्षीय पातळीवर लावला जाईल. पक्षाचा म्हणून त्यांनी तासगाव व मिरज मतदारसंघात प्रचार केला नाही. ही त्यांची राजकीय शोकांतिका म्हणावी लागेल, अशी टीका कदम यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसने पलूसमध्ये भाजपाच्या उमेदवारास मदत केली. पक्षाने अधिकृत उमेदवार देउनही प्रचाराला एकही नेता मतदार संघात फिरकला नाही. यावरून पलूसमध्ये राष्ट्रवादी व भाजपाचे साटेलोटे असल्याचे स्पष्ट होते. इस्लामपूरमध्ये जितेंद्र पाटील यांची उमेदवारी पक्षाने निश्चित केली होती. एकास एक करण्याबाबत हेतू काय होता हे समजले नाही. व्यक्तिगत कारणातून पक्षाचे अहित पाहणे चुकीचे आहे.
राज्यात काँग्रेस शतकाहून अधिक जागा जिंकेल, जिल्ह्यात काँग्रेसला ४ ते ५ जागा मिळण्यात अडचण वाटत नाही. निकालानंतर दोन्ही काँग्रेसची आघाडी होणार का याबाबत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र आघाडी तुटली ते बरे झाले असे आपले मत असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपाकडे एकही राज्याला सर्वसमावेशक चेहरा नसल्याने पंतप्रधान मोदींना गल्ली बोळातून फिरावे लागले असल्याचे विश्वजित कदम यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा