लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन जवळपास दोन आठवडे उलटले आहेत. मात्र, अजूनही सांगली लोकसभा मतदारसंघ आणि त्याच्या तिकीटवाटपावेळी मविआमध्ये घडलेल्या घडामोडी यासंदर्भातली चर्चा चालूच आहे. याअनुषंगाने सांगलीतील काँग्रेसचे प्रमुख नेते विश्वजीत कदम यांनी तिकीट नाकारल्याची खंत जाहीरपणे अनेकदा बोलून दाखवली आहे. या पार्श्वभूमीवर विशाल पाटील यांना काँग्रेसकडून तिकीट नेमकं का नाकारलं गेलं? याच्या कारणांची सध्या चर्चा चालू असून त्यात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं नाव घेतलं जात आहे. त्यासंदर्भात विशाल पाटील आणि विश्वजीत कदम या दोघांनीही भूमिका स्पष्ट केली आहे.
विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी सांगलीच्या जागेवरून काय काय घडलं, यासंदर्भात भाष्य केलं आहे. त्यावेळी सांगलीचं तिकीट काँग्रेसला आणि पर्यायाने विशाल पाटील यांना नाकारण्यामध्ये शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सहभाग असल्याच्या चर्चांबाबत त्यांना विचारणा करण्यात आली. जयंत पाटील हेच चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी मातोश्रीवर घेऊन गेले होते का? असाही प्रश्न त्यांना करण्यात आला. त्यावर विशाल पाटील यांनी दिलेल्या एका उत्तराबाबत विश्वजीत कदम यांनी “हे काहीसं आवश्यक, काहीसं अनावश्यक असं काहीतरी बोलून गेले”, असं म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
काय म्हणाले विशाल पाटील?
जयंत पाटील चंद्रहार पाटील यांना मातोश्रीवर घेऊन गेले या चर्चा होत्या, हे विशाल पाटील यांनी मान्य केलं. “चर्चा होत्या हे खरं आहे. वृत्तवाहिन्यांवरच आम्ही बऱ्याच चर्चा ऐकत असतो की ४० आमदार उद्धव ठाकरेंना का सोडून गेले? त्या ४० आमदारांना जर हे विचारलं तर ते सांगायचे की उद्धव ठाकरेंची भेटच मिळत नव्हती. संपर्कच नव्हता. मग अशी तक्रार असताना एखादी व्यक्ती मुंबईत पोहोचते, उद्धव ठाकरेंना भेटते, उमेदवारी जाहीर करून येते, एवढ्यापर्यंत पोहोचतो?” असा प्रश्न विशाल पाटील यांनी उपस्थित केला.
“असं सहजासहजी तिथे जाऊन भेट होत नाही.आमदारांनाच भेट मिळत नाही आणि पैलवान जाऊन भेटून आले. मग लोकांना संशय येणं साहजिक आहे. आता ते खरं किती हे नाही सांगता येणार. आमदार-खासदार ज्या व्यक्तीला भेटू शकत नाहीत, त्या व्यक्तीला हे पैलवान कसे सहज भेटले? त्यामुळे त्या चर्चा काही चुकीच्या नाहीत. ते कुठल्या कारणासाठी भेटले हे माहीत नाही. पण भेट झाली असावी”, असा दावा विशाल पाटील यांनी केला.
दरम्यान, विशाल पाटलांच्या या उत्तरावर विश्वजीत कदम यांनी लागलीच सारवासारव केल्याचं मुलाखतीत दिसून आलं. “विशाल पाटलांनी जरा जे आवश्यक होतं आणि अनावश्यक होतं असं काहीतरी बोलले आहेत आत्ता. माझं आत्तापर्यंत पूर्ण मौन होतं”, असं कदम म्हणाले.
“आम्हाला कुठेही आघाडी धर्माला धक्का लावायचा नव्हता”
“आम्हाला कुठेही मविआला धक्का लावायचा आमचा प्रयत्न नव्हता. आम्ही सर्वतोपरी सगळ्यांना समजावून सांगत होतो की जिल्ह्याचं राजकारण समजून घ्या. शिवसेना, मविआच्या सगळ्या नेत्यांना आम्ही समजावून सांगत होतो. पण ते घडलं नाही”, अशी खंत विश्वजीत कदम यांनी बोलून दाखवली.
“चंद्रहार पाटील कट्टर शिवसैनिक नव्हते. त्यांचा पक्षप्रवेश केला गेला आणि ६ दिवसांत त्यांची उमेदवारी जाहीर केली गेली. उमेदवारी जाहीर करताना चर्चा झाली असती तर त्यातून आपण सामंजस्याने चांगला मार्ग काढू शकलो असतो. काँग्रेसची तर इच्छा होती की मी लढावं. पण मी शब्द दिला होता विशाल पाटलांना. पण नंतर ज्या वेगाने गोष्टी घडत गेल्या, ते पाहता आम्हालाही कळेना की एवढं वेगानं हे सगळं कसं घडू शकतं?” अशा शब्दांत विश्वजीत कदम यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
“जयंत पाटलांना सांगलीतली स्थिती माहिती होती”
“मी संजय राऊत, आदित्य ठाकरेंना या सगळ्या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. जयंत पाटील राज्यातले ज्येष्ठ नेते आहेत. ते तर त्या चर्चेतही होते. काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेकडून संजय राऊत व अनिल देसाई होते. शेवटी काही विषय दिल्लीपर्यंत जायचे. त्यात जयंत पाटील होतेच. जिल्ह्यातली वस्तुस्थिती त्यांना माहितीच होती”, असंही सूचक विधान विश्वजीत कदम यांनी केलं.