मराठी साहित्य संमेलनातील वादानंतर यवतमाळ कुठे आहे, असा प्रश्न विचारणारे दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांना सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी खडे बोल सुनावले आहे. यवतमाळ कुठे हे तुम्हाला कसं माहित असणार? हा काही जुहू बीच सारखा ग्लॅमरस भाग नाही. पुण्यातील कोणत्याही कट्ट्यावर यवतमाळ कुठं आहे आणि ते कसं आहे ते आम्ही तुम्हाला चर्चेत नकाशासह समजावून सांगायला तयार आहोत, असे चौधरींनी म्हटले आहे.

मराठी साहित्य संमेलनातील वादावर दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. मला तर यवतमाळ कुठे आहे हेच माहीत नव्हते. ते आमच्या प्रणव सखदेवने समजावले. भरपूर मोकळेपणाने लिहायला आणि मनसोक्त वाचायला लाखो माणसे येऊन गर्दी करायची का गरज आहे?, असे त्यांनी म्हटले होते.

सचिन कुंडलकरांच्या या पोस्टवर टीकेची झोड उठली. सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी देखील सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून कुंडलकरांना प्रत्युत्तर दिले. विश्वंभर चौधरी म्हणतात, यवतमाळ कुठे हे तुम्हाला कसं माहित असणार? हा काही ग्लॅमरस भाग नाही जुहूबीच सारखा. हा तर महाराष्ट्रातला तो जिल्हा जिथं सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा अंधार भरून राहिला आहे. तुमचं अन्न तो तयार करतो, त्यांच्यातला शेवटचा आत्महत्या करत नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे मोजून धान्य मिळत राहील.तोपर्यंत त्याला तुच्छ लेखण्याची मस्तीही चालून जाईल, असे चौधरींनी सुनावले आहे.

तुम्ही त्याचं पोट चालवता त्यापेक्षा जास्त तोच तुमचं पोट चालवतो. त्याच्या शेजारच्याच जिल्ह्यात वीज तयार होते जी तुम्हाला सदैव लाईम’लाईट’मध्ये ठेवते. तुम्ही शूटींगच्या वेळी ‘लाईट्स ऑन’ वगैरे ओरडत असाल तेव्हा त्याचे आभार माना कारण वीज निर्मितीदरम्यान होणारं भयंकर प्रदूषण तो सहन करतो आणि तुम्हाला कायम उजेडात ठेवतो, स्वतः १५-१५ तासाचं ‘लोड शेडींग’ सहन करतो, याकडेही चौधरींनी लक्ष वेधले आहे.

पुणे- मुंबईत स्थिरावलेला त्या शेतकऱ्याचा मुलगा-भाचा-भाऊ-पुतण्या हेच तुमच्या सिनेमाचे गल्ले भरून देतात. यवतमाळ कुठं आहे आणि ते कसं आहे ते आम्ही तुम्हाला पुण्यातील कोणत्याही कट्ट्यावर चर्चेत नकाशासह समजावून सांगू, आमच्याशी बोलल्यावर तुमच्या मनात असे प्रश्न उभेच राहणार नाहीत, असे चौधरींनी म्हटले आहे. सर्वच स्तरातून टीकेची झोड उठल्याने सचिन कुंडलकरांनी ती वादग्रस्त पोस्ट फेसबुकवरुन डिलीट केली असून त्यांनी अकाऊंटदेखील बंद केले आहे.

Story img Loader