आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांना विठ्ठलाची आस लागलेली असते. विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी वारी करणारे लाखो भाविक तो क्षण अनुभवण्यासाठी वारी करतात. दरवर्षी न चुकता वारी करणारेही अनेक वारकरी आहेत. तसंच ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्याही पंढरपूरला जातात. वारकऱ्यांचा हा उत्साह बघण्यासारखा आणि अनुभवण्यासारखा असतो. आषाढीच्या दिवशी विठ्ठलाची महापूजा करण्यात येते. या पूजेचं निमंत्रण वारकऱ्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं.
गहिनीनाथ औसेकर महाराजांनी दिलं निमंत्रण
आषाढी यात्रा नियोजनासंदर्भात पंढरपूर मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. १७ जुलै रोजी पंढरपुरात आषाढी यात्रेचा सोहळा पार पडणार आहे. या यात्रेतील शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने निमंत्रण देण्यात आलं आहे.
हे पण वाचा- पालखी सोहळ्यासाठी देहू-आळंदी मार्गावरील वाहतुकीत बदल; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन
टाळ, चिपळ्या, विठ्ठल मूर्ती देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार
मुख्यमंत्री एकनाथ शइंदे यांचा औसेकर महाराजांच्या हस्ते वीणा, वारकरी पताका, विठ्ठलाची मूर्ती आणि चिपळ्या देऊन सत्कार करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचाही मंदिर समितीने सत्कार केला. आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे २ वाजून २० मिनिटांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मानाचे वारकरी विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा करणार आहेत.
आरोग्यवारीचाही शुभारंभ
आषाढी वारीच्या निमित्ताने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ‘आरोग्यवारी – आली आपल्या दारी’ या उपक्रमाचे उदघाटन आज या वारीला भगवा झेंडा दाखवून करण्यात आले. या आरोग्यवात आळंदी ते पंढरपूर या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावर आणि देहू ते पंढरपूर या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाने पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. या दरम्यान सर्वांना मोफत औषधे दिली जाणार आहेत. तसंच या उपक्रमाद्वारे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून दुर्धर आजारांना अर्थसहाय्य करण्यात येणाऱ्या आजारांची यादी आणि योजनेचा लाभ कसा मिळवावा याची विस्तृत माहिती देणारे माहीतीपत्रक देखील वाटण्यात येणार आहे.
यावेळी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी समिती चे सह-अध्यक्ष ह भ प श्री गहिनीनाथ महाराज औसेकर , मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले आणि वैद्यकीय सहाय्यक उपस्थित होते.