पंढरपूर : पंढरीची वारी आता थेट साता समुद्रापार जाणार आहे. मूळचे अहिल्यानगरचे पण सध्या लंडन स्थायिक असलेले विठ्ठलभक्त अनिल खेडकर आणि त्यांची दिंडी पंढरपूर येथून थेट लंडनला श्री विठ्ठलाच्या पादुका घेऊन जात आहेत. १४ एप्रिल ते २१ जून या कालावधीत तब्बल २२ देश आणि अठरा हजार किलोमीटरचा प्रवास या अनोख्या दिंडीतून करणार आहेत. या विठ्ठलाच्या पादुकेचे पूजन विठ्ठल मंदिरात करण्यात आले असून, ही अनोखी दिंडी लंडनकडे प्रस्थान ठेवली.

पंढरी वारीची ख्याती जगभरात पसरली आहे. अनेक अभ्यासक भक्तमंडळी या वारीचा अनुभव घेताना दिसून येतात. आता अहिल्यानगरचे पण सध्या लंडन स्थायिक असलेले खेडकर या भाविकाने विठ्ठलाच्या पादुकांच्या दिंडीचे आयोजन केले आहे. अनिल एकनाथ खेडकर हे भारतात होते त्यावेळेस त्यांनी आळंदी ते पंढरपूर अशी वारी देखील केलेली आहे. त्यावरून लंडन येथे विठ्ठल मंदिर उभे करावे आणि त्या पादुका वारकरी संप्रदायाप्रमाणे दिंडीच्या माध्यमातून आणून त्याची प्राणप्रतिष्ठा करण्याचे खेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठरवले.

पंढरपूर येथून लंडन असा प्रवास करताना विविध देश, त्यांच्या विविध परवानगी, पास इत्यादी कायदेशीर मान्यता सहा महिन्यांपासून सुरू होती. यासाठी २२ देशांच्या चारचाकी गाडी प्रवासाच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. पुढे त्यांनी १४ एप्रिल ते २१ जून हा कालावधी निश्चित केला. रोज किती किलोमीटर प्रवास, मुक्काम यांचे नियोजन केले. अमेरिका, युरोप येथे मराठी मंडळे, इस्कॉन, अक्षरधाम तसेच विविध मंदिरे यांनी सहकार्य केल्याचे खेडकर यांनी सांगितले.

१४ एप्रिल रोजी येथील श्री विठ्ठल मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मनोज श्रोत्री, सदस्य उपस्थित होते. टाळ मृदंग आणि हरिनामाच्या जयघोषात ही अनोखी सातासमुद्रापार दिंडीचे मोठ्या उत्साहात प्रस्थान ठेवले आहे. दिंडी लंडन येथे २१ जून रोजी विसावणार आहे. पंढरीचा विठुराया आता लंडनच्या वारीला निघाला, असं म्हणलं तर वावगे ठरणार नाही.

वारकरी संप्रदायात एकमेकांच्या पाया पडणे, सर्व समभाव, सलोखा अनुभवला. याचा प्रसार, लाभ हा जगभर व्हावा. वारकरी संप्रदायाचे विचार रूजावेत, अशी इच्छा आहे. लंडन येथे भव्य विठ्ठल मंदिर व्हावे आणि प्रति पंढरपूर करण्याचा मानस असल्याचे अनिल एकनाथ खेडकर यांनी सांगितले.